पुणे : सरपंचपदाच्या 55 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात | पुढारी

पुणे : सरपंचपदाच्या 55 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात

पुणे; पुढारी वृत्तसेवा: जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींची निवडणूक सुरू असून, त्यातील पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या आहेत. तर एका ग्रामपंचायतीसाठी एकही अर्ज आलेला नाही. त्यामुळे सरपंचपदाच्या 55 जागांसाठी 210 उमेदवार रिंगणात आहेत. सरपंच आणि सदस्यपदांसाठी 18 सप्टेंबर रोजी मतदान होणार असून, 19 सप्टेंबर 2022 रोजी मतमोजणी होणार आहे.

ग्रामपंचायत सरपंच पदाची निवड थेट मतदारांतून होत असून, जिल्ह्यातील 61 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी 315 जणांनी अर्ज केला होता. त्यातील 103 जणांनी माघार घेतली, तर दोघांचा अर्ज बाद झाला होता. पाच ग्रामपंचायती बिनविरोध निघाल्या असून, त्यात खेड आणि आंबेगाव तालुक्यातील प्रत्येकी एक तर जुन्नर तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश आहे.

जिल्ह्यातील खेड 4, भोर 2, जुन्नर 33 आणि आंबेगाव 16 ग्रामपंचायतींसाठी मतदान होणार आहे. तालुक्यातील 55 ग्रामपंचायतीमधील सदस्यांच्या 485 जागांसाठी निवडणूक होत असून, त्यातील 240 जागा बिनविरोध निघाल्या आहेत. त्यामुळे
आता 245 सदस्यांसाठी मतदान होणार आहे. विशेष म्हणजे सदस्यांच्या 16 जागांसाठी एकही अर्ज आलेला नाही.

 

Back to top button