जामखेड : फळबाग योजना वर्षभरातच गुंडाळली बासनात | पुढारी

जामखेड : फळबाग योजना वर्षभरातच गुंडाळली बासनात

दीपक देवमाने : 

जामखेड : युती शासनाने सन 2018 -19 मध्ये शेतकर्‍यांसाठी फळबाग लागवडीसाठी ‘भाऊसाहेब फुंडकर फळबाग’ ही महत्त्वकांक्षी योजना आणली. ही योजना दोन वर्षांपासून बंद केल्याने मोठे भूधारक शेतकर्‍यांचे नुकसान झालेे. त्यामुळे पाच एकराच्या जास्त क्षेत्र असलेल्या शेतकर्‍यांचे फळबाग लागवडीचे स्वप्न अधुरे राहिले. त्यामुळे ही योजना सुरू करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.
रोजगार हमी योजनेमध्ये बहु भूधारक शेतकर्‍यांना फळबागासह विविध योजनांपासून वंचित राहतात. ही बाब लक्षात घेत तत्कालीन युती सरकारने ही योजना सुरू केली होती. योजना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करून लकी ड्रॉ पद्धतीने त्या लाभार्थीची निवड करण्यात येत होती. या योजनेत शेतकर्‍यांना रोपे, ड्रीप, फळबागेसाठी खतांसाठी अनुदान मिळत होते. त्यामुळे शेतकर्‍यांसाठी महत्वकांक्षी योजना होती; परंतु 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर सरकार बदलले तेव्हापासून योजना बंद आहे. यामुळे अनेक शेतकरी फळबाग लागवडीपासून वंचित राहिले.

या योजनेत तालुक्यातील शेतकर्‍यांना लाभ घेतला होता. मोठ्याप्रमाणात शेतकर्‍यांनी ऑनलाईन नोंदणी केली होती. सुरुवातीच्या शेतकर्‍यांनाच या योजनेचा लाभ मिळाला. एक वर्षे योजना सुरळीत राहिली. त्यांनतर एकही शेतकर्‍याला त्याचा लाभ झाला नाही. ही योजना प्रभावी सुरू करावी, या दोन वर्षाचा वाढीव लक्षांक देऊन, ही योजना पुनर्जीवित करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

महत्त्वाच्या योजनांकडे लोकप्रतिनिधींची डोळेझाक
गेल्या दोन वर्षांपासून भाऊसाहेब फुंडकर योजना शासनाने बासनात गुंडाळली असून, ही योजना सुरू करण्यासाठी लोक प्रतिनिधींनी लक्ष देऊन मार्गी लावण्याची गरज आहे. कर्जत-जामखेड मतदार संघात दोन आमदार आहेत. शेतकर्‍यांच्या महत्त्वाच्या योजनाकडे डोळे झाक होत असल्याने शेतकर्‍यांमध्ये नाराजीचा सूर आहे.

शिंदे-फडणवीस सरकारने योजना सुरू करावी
मोठ्या भूधारक शेतकर्‍यांसाठी ही महत्त्वकांक्षी योजना असून, ही योजना सुरू केल्याने शेतकर्‍यांना मोठा आर्थिक हातभार लागणार असून, शेतकरी सधन होण्यास मदत होणार असल्याने राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने सुरू करण्याची मागणी शेतकर्‍यांनी केली.

Back to top button