जळगाव : आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले अखेर निलंबित (व्हिडिओ) | पुढारी

जळगाव : आक्षेपार्ह वक्तव्य भोवले, एलसीबीचे पोलीस निरीक्षक बकाले अखेर निलंबित (व्हिडिओ)

जळगाव : मराठा समाजाविषयी आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक किरणकुमार बकाले यांची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली होती. मात्र, समाजबांधवांकडून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली होती. समाजाचा रोष लक्षात घेता, पोलीस अधीक्षकांनी तात्काळ बकाले यांच्या निलंबनाचा प्रस्ताव तयार करुन तो विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे सादर केला होता. त्यानुसार या प्रस्तावावर स्वाक्षरी करण्यात येवून बकालेंचे निलंबन करण्यात आले आहे.

पोलिस कर्मचार्‍याशी बोलताना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरत वक्तव्य केले होते. याचे जिल्हाभरात पडसाद उमटल्यानंतर नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर-पाटील यांनी बुधवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास बकाले यांच्या निलंबनाचे आदेश काढल्याने पोलीस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. दरम्यान जळगाव विभागाचे सहाय्यक पोलीस उपअधीक्षक कुमार चिंथा आता बकाले यांची विभागीय चौकशी करणार आहेत.

पृथ्वीराज चव्हाण आज मोठा निर्णय जाहीर करणार?; तर्क- वितर्कांना उधाण

आमदारांनी केली होती निलंबनाची मागणी
आमदार मंगेश चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी एका समाजाविषयी आक्षेपार्ह व अश्लील भाषा वापरल्याप्रकरणी त्यांना निलंबित करण्याची मागणी केली होती. तसेच बडतर्फ करण्याचीही आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. मागणी मान्य न झाल्यास मराठा समाजाचा महामोर्चा काढण्याचा इशारा दिला होता. याची गंभीर दखल घेत नाशिक विभागाचे पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांनी आ. चव्हाण यांच्यासोबत संवाद साधत बकाले यांचे निलंबनाचे आदेश काढून चौकशी लावतो, असे आश्वासन दिले होते.

किरणकुमार बकाले याने केलेलं वक्तव्य हे पोलीस दलाची प्रतिमा मलिन करणारे असून अशा प्रवृत्तींना पाठीशी घातले जाणार नाही. बकाले याच्यावर कारवाई करण्यासाठी प्रक्रिया सुरू झाली असून कायदा व सुव्यवस्था अडथळा निर्माण होईल, असं कुठलंही कृत्य मराठा समाजाने करू नये, तसंच पोलीस दलास सहकार्य करावं, असं आवाहनही पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी केलं आहे.

हेही वाचा :

Back to top button