सतत थकवा जाणवतोय? वेळीच करा ‘हे’ उपाय

सतत थकवा जाणवतोय?
सतत थकवा जाणवतोय?
Published on
Updated on

मन उत्साही असेल तर दिवस आनंदात जातो. मन उत्साही असण्यासाठी शरीर निरोगी असणे आवश्यक असते. त्यासाठी जीवनशैली आरोग्यदायी असणे आवश्यक आहे. हल्ली आरोग्याकडे दुर्लक्ष होण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळेच अनेक जण दिवसभर थकल्यासारखे दिसतात. सतत जाणवणार्‍या थकव्यामुळे आपल्याला आयुष्याचा आनंद घेताच येत नाही. परिणामी आपला स्वभाव दिवसेंदिवस मुडी आणि त्रासदायक होऊ लागतो. अनेकदा सतत थकवा जाणवणे हे एखाद्या व्याधीचेही लक्षण असू शकते. त्यामुळे याबाबत वेळीच उपचार करणे आवश्यक ठरते.

आधुनिक काळात थकवा किंवा दमणे ही बाब सामान्य झाली आहे. प्रत्येकाच्या मागे इतकी धावपळ असते त्यामुळे सतत थकवा आलेला असतो. कामाचे जास्त तास, एकामागोमाग येणार्‍या जबाबदार्‍या यांच्यामुळे शरीराला हवी असणारी रात्रीची आठ तासांची झोप मिळणे शक्य होत नाही. त्यामुळे थकवा आणि दमणूक होत असते, पण रात्रीची आठ तास पुरेशी झोप होऊनही थकल्यासारखे, शक्तिपात होणे अशी लक्षणे दिसत असतील तर.. आपल्या पापण्या सतत मिटत असतील, झोप येत असेल तर त्यामुळे नक्कीच निराश व्हायला होते. यामागे अपुरी झोप हे कारण असू शकते. मुळात आपण किती तास झोपतो याहीपेक्षा झोपेची गुणवत्ता महत्त्वाची असते. मात्र, रात्रभर व्यवस्थित झोप घेऊनही दुसरे दिवशी आळस येत असेल तर त्याला खालील काही कारणे याला जबाबदार आहेत का याचा विचार करा.

पुरेशा व्यायामाचा अभाव ः आपला बहुतेक वेळ हा कामाच्या ठिकाणी जातो. जवळपास आठ तास आपण एका जागी आपल्या डेस्कवर काम करत असतो. म्हणजे बैठ्या कामाचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे वजन वाढते. वजनवाढ ही अनारोग्यकारी आहेच, पण त्यामुळे जास्त थकवा आणि आळशीपणा वाढण्यासही ती कारणीभूत ठरते. बैठ्या कामामुळे आपली ऊर्जा जास्त खर्च होत नसल्यामुळे शांत गाढ झोप लागत नाही. याउलट दिवसभर श्रम करणार्‍या किंवा शारीरिक हालचाली अधिक असणार्‍या व्यक्तींकडे पहा, त्यांना अंथरुणावर पडताक्षणीच झोप लागते.

पाणी कमी पिणे ः दिवसभरात पाणी प्यायचे प्रमाण किती आहे हे खूप महत्त्वाचे आहे. शरीरातील पाणी कमी झाल्यामुळेही थकवा येण्याचे प्रमाण अधिक असते. आपल्या हृदयाकडून कमी गतीने ऑक्सिजन मिळत असल्यामुळे शरीरातील अवयव मंद गतीने काम करतात याचा परिणाम म्हणून आपल्याला थकवा किंवा पूर्णपणे शक्तिपात झाल्यासारखे वाटते.

अपुरा आहार ः अतिमेद किंवा अधिक कॅलरी असणारा आहार घेत असाल तर तेदेखील एक थकव्याचे कारण असू शकते. आरोग्यकारी, समतोल आहार हा आरोग्यासाठी गरजेचा असतो. त्यामुळे आपले शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकारचे आरोग्य सुधारते. तसेच थकव्याचा सामना करण्यासाठी शरीरातील पोषक द्रव्यांची मदत होते.

नैराश्य किंवा ताण ः अनेकांना आपल्याला ताण आला आहे किंवा नैराश्य अर्थात डिप्रेशन आले आहे हेच मुळात आपल्या लक्षात येत नाही आणि थकलोय, कशातच रस नाही त्यामुळे काही करण्याची प्रेरणा, प्रोत्साहन मिळत नसल्याची वरवरची लक्षणे आपल्याला दिसतात. आपल्या आहाराकडे आणि व्यायामाकडे लक्ष द्या. आहार आणि व्यायाम याची योग्य जुळणी केल्यास ताण आणि नैराश्य कमी होण्यास मदत होईल तर मेडिटेशनसारख्या विश्रांती देणार्‍या पद्धतींचाही वापर करता येऊ शकतो.

रक्तातल्या साखरेचा असमतोल ः रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्यास आपला आहार हे सुद्धा एक कारण असू शकते. त्यामुळेही आपली ऊर्जा कमी होते. प्रक्रियायुक्त पदार्थांचे किंवा अतिगोड पदार्थांचे अधिक सेवन करत असाल तर रक्तातील साखरेचे प्रमाण कमी होण्याचा अनुभव सातत्याने येऊ शकतो. शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवण्यासाठी आहारातील प्रक्रियायुक्त साखरेचे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.

वैद्यकीय समस्या- आपला आहार योग्य असेल, भरपूर पाणी पित असाल, नियमित व्यायाम करत असाल, तसेच नैराश्य किंवा अतिरिक्त ताणही जाणवत नसेल आणि तरीही आपल्याला थकव्याची समस्या भेडसावत असेल तर आपल्याला काही वैद्यकीय समस्या नाही ना याची तपासणी करून घेणे योग्य ठरेल. काही वेळेला असा थकवा हा आजारही असू शकतो. क्रोनिक फटीग सिंड्रोम, स्लीप अप्नोआ, थायरॉईड ग्रंथींमुळे येणारा बारिक ताप अशा किंवा या प्रकारच्या काही तक्रारींमध्ये असा थकवा येत असतो. त्यामुळे स्वतःच काही निदान न करता वैद्यकीय सल्ल्यासाठी डॉक्टरांना गाठणे महत्त्वाचे आहे.

  • डॉ. महेश बरामदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news