नाशिक, येवला : पुढारी वृत्तसेवा
शहरातीळ विंचूर चौफुली येथील पोलिस चौकीसमोर असलेल्या गणेश मेडिकल हे दुकान फोडून चोरट्यांनी रोख रकमेसह चॉकलेट व निरोध पाकिटे लांबविल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरीची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.
55 हजारांची रोकड चोरी करून सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करण्यात आली. हे दुकान फोडताना चोरट्यांनी छतालगत मोठा बोगदा पाडून दुकानात प्रवेश केल्याचे दिसून आले. दुकानाच्या गल्ल्यातील शनिवारी आणि रविवारी असे दोन दिवस बँक बंद असल्या कारणाने जमा झालेली अंदाजे 50 ते 60 हजारांची रोकड, चॉकलेट बॉक्स, निरोध बॉक्स आणि इतर मुद्देमाल चोरून नेला. त्यामुळे पोलिसांनी कसून तपास करून या चोरट्यांना आवर घालावा, अशी मागणी नागरिक करत आहेत.
दरम्यान, विंचूर चौफुली येथील हायमास्ट तसेच सीसीटीव्ही यंत्रणा शोभेचे बाहुले ठरले असून, बऱ्याच दिवसांपासून हायमास्ट सीसीटीव्ही बंद असल्यामुळे या परिसरात भुरट्या चोरट्यांची चंगळ होत आहे. प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हे हायमास्ट आणि सीसीटीव्ही यंत्रणा त्वरित कधी चालू करणार, असा सवाल उपस्थित होत आहे. या घटनेने व्यापारीवर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, शहर पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्यासह पोलिस उपनिरीक्षक सूरज मेढे, पोलिस नाईक राजेंद्र पाटील यांनी घटनास्थळी पाहणी करून शोधपथक रवाना केले आहेत.