

राजकीय उद्देशातून आयोजित केल्या जाणार्या पदयात्रेचे यश आणि अपयश हे निवडणुकीच्या निकालावर ठरवले जाते. भारत जोडो या पदयात्रेत अन्य विरोधी पक्षांना सोबत न घेणे ही काँग्रेसची मोठी रणनीती ठरू शकते. पदयात्रेतून राहुल गांधी हे मतदारांच्या किती जवळ जातात आणि काँग्रेसला किती पुढे नेतात, हे समजण्यासाठी वाट पाहावी लागेल. कन्याकुमारीपासून काँग्रेसची भारत जोडो पदयात्रा सुरू झाली आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी या यात्रेच्या माध्यमातून दीडशे दिवसांत
सुमारे 3500 किलोमीटर प्रवास करत आहेत. वास्तविक भारतातील जनतेला राजकीय पदयात्रा, यात्रा नवीन नाहीत. महात्मा गांधी, एन. टी. रामा राव, लालकृष्ण अडवाणी, सुनील दत्त, राजीव गांधी, चंद्रशेखर यांसारख्या व्यक्तिमत्त्वांनी राजकीय यात्रेचे आयोजन केले. त्यांना आपले म्हणणे लोकांपर्यंत पोचवायचे होते. आजकाल सोशल मीडियामुळे घरबसल्या लाखो लोकांशी संवाद साधणे सहज शक्य आहे.
एखादी यात्रा अध्यात्माचा प्रचार, प्रसार, चिंतन किंवा काही शिकण्याच्या उद्देशाने केली जात असेल तर ते यशस्वी होण्याचे प्रमाण अधिक असते. पण राजकीय उद्देशातून आयोजित केल्या जाणार्या यात्रेचे यश आणि अपयश हे निवडणुकीच्या निकालावर ठरवले जाते. काँग्रेसच्या यात्रेच्या यशापयशाचा हाच एक निकष आहे.
पुढील तीन-चार महिन्यांत गुजरात आणि हिमाचल प्रदेशसारख्या राज्यांत निवडणुका होत आहेत. 2017 च्या गुजरात विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला 182 पैकी 77 जागा मिळाल्या होत्या. त्यावेळी राहुल गांधी आणि अशोक गेहलोत यांच्या टीमने बरीच मेहनत केली होती. यंदा मात्र राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेला अधिक वेळ देण्याचे ठरविले आहे. ते या विधानसभा निवडणुकीबाबत फारसे उत्सुक दिसत नाहीत. राजकीय आखाड्यात अपयशी ठरत असल्याचा आरोपावरून नाराज तर नाहीत ना किंवा आत्मविश्वास तर गमावून बसले नाहीत ना, असे प्रश्न त्यामुळे उपस्थित होत आहेत.
अर्थात राहुल गांधी यांच्यासाठी ही पदयात्रा सोपी नाही. ते एक प्रगल्भ राजकीय नेते म्हणून प्रस्थापित होणार नाहीत, यासाठी 2011 नंतर त्यांची खिल्ली उडविणारे तंत्र विकसित करण्यात आले. त्यांना एखाद्या वक्तव्यावरून ट्रोल केले जाते. अशी 'ट्रोल आर्मी' या पदयात्रेदरम्यान सक्रिय आहे. याशिवाय राजकीय विरोधक देखील राहुल गांधी यांना सातत्याने टार्गेट करत आहेत. माध्यमातून सातत्याने टीका करणार्या गटाचा देखील त्यांना सामना करावा लागणार आहे. अर्थात राहुल गांधी एक कडवे आणि सक्षम नेते आहेत. या पदयात्रेबाबत ते गंभीर आहेत. कदाचित गुजरात आणि हिमाचल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला राहुल गांधी जाऊ शकतात आणि पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेत देखील सामील होऊ शकतात. या पदयात्रेत अन्य विरोधी पक्षांना सोबत न घेणे ही काँग्रेसची मोठी रणनीती ठरू शकते. यात योगेंद्र यादव, अरुणा रॉय यांसारखे सिव्हिल सोसायटीचे लोक सोबत आहेत. ही पदयात्रा 12 राज्यांतून प्रवास करत श्रीनगरला थांबेल.
मात्र यात गुजरात, ओडिशा, बिहार आणि बंगाल ही मोठी राज्ये नाहीत. उत्तर प्रदेशात देखील केवळ बुलंद शहरात ही पदयात्रा जाणार आहे. यावरून बिगर भाजप आणि बिगर काँग्रेस सरकार असलेल्या राज्यांत या पदयात्रेचा परिणाम होणार नाही, यासाठी काँग्रेसचे रणनीतीकार प्रयत्नशील राहतील, असे दिसते. समान विचारसरणीच्या राज्यांत म्हणजेच तेजस्वी यादव आणि अखिलेश यादव यांच्याकडे पदयात्रा नेण्याची आवश्यकता काँग्रेसला वाटत नाही. काही जण राहुल गांधी यांच्या पदयात्रेची तुलना ही राजीव गांधी यांच्या 1990 च्या सद्भावना यात्रेशी करत आहेत आणि ते चुकीचे आहे. राजीव गांधी हे निश्चितच 1989 च्या सार्वत्रिक निवडणुकीत सत्तेपासून वंचित राहिले. पण काँग्रेसने 197 जागा जिंकल्या होत्या. त्यांनी सरकार स्थापनेचा दावा केला नव्हता. म्हणूनच विश्वनाथ प्रताप सिंग यांचे सरकार आले. उत्तर प्रदेशात काँग्रेसची बाजू कमकुवत होऊ लागली होती. त्यामुळे त्यांनी उत्तर प्रदेशची निवड केली. यासाठी राजीव गांधी यांनी जनरल डब्यातून प्रवास केला. गुजराती अस्मितेच्या नावावर नरेंद्र मोदी यांनी 2002 च्या दंगलीत आरोपी केल्याच्या निषेधार्थ गौरव यात्रा काढली. सुनील दत्त यांनी देखील पंजाबमध्ये शांतता प्रस्थापित करण्यासाठी यात्रा काढली. दिग्विजय सिंह यांनी 2017 मध्ये नर्मदा परिक्रमा केली होती. एन. टी. रामा राव, लालकृष्ण अडवाणी यांनी देखील राजकीय उद्देशातून पदयात्रा काढल्या. साहजिकच या पदयात्रेत असणारा उद्देश हा सध्याच्या काँग्रेसच्या भारत जोडो पदयात्रेत दिसत नाही. सर्वसामान्य लोक हे व्यावहारिक पातळीवरून पदयात्रेकडे पाहत आहेत.
राजकीय संवाद हा थेटपणे व्हायला पाहिजे, हे काँग्रेसने लक्षात घेतले पाहिजे. विश्वनाथ प्रताप सिंग आणि जयप्रकाश नारायण यांनी थेट संवादावर भर दिला आणि त्यांच्या यात्रेला यश मिळाले. कोणताही शाब्दिक फुलोरा न लावता एखादा राजकीय संदेश दिला जातो तेव्हा त्याचा लोकांवर थेट परिणाम होतो. भाजपची भूमिका लोकांना लवकर पचनी पडण्यामागचे कारण म्हणजे त्यांच्या गोष्टी सहजपणे लक्षात येतात. राहुल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा कितपत यशस्वी होईल, हे आताच सांगता येणार नाही. प्रियांका गांधी यांनी देखील उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या काळात दोनशेपेक्षा अधिक सभा केल्या होत्या. तरीही काँग्रेसला दोनच जागा मिळाल्या. परिणामी प्रियांका गांधी यांनी घेतलेल्या मेहनतीची आता कोणीही चर्चा करत नाही. काँग्रेसची सर्वात मोठी अडचण म्हणजे आता त्याची एखादी विशिष्ट व्होट बँक राहिलेली नाही. धार्मिक, जात किंवा क्षेत्रीय पातळीवर देखील काँग्रेसचा मतदार दिसत नाही. एकेकाळी या गोष्टी काँग्रेसची बलस्थाने होती. आता हीच बाब त्यांना कमकुवत करत आहे. राहुल गांधी यांच्या पदयात्रेचा परिणाम 2024 च्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निकालातूनच समजेल. पदयात्रेच्या माध्यमातून राहुल गांधी हे मतदारांच्या किती जवळ जातात आणि काँग्रेसला किती पुढे नेतात, हे समजण्यासाठी वाट पाहावी लागेल.
– रशिद किडवई,
राजकीय विश्लेषक, नवी दिल्ली