शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे | पुढारी

शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू: बावनकुळे

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आगामी काळ हा निवडणुकांचा आहे. राज्यात लोकसभेच्या 45 तर विधानसभेच्या दोनशे जागा निवडून आणण्याचा संकल्प भारतीय जनता पार्टीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी करण्याचे आवाहन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी धुळ्यातील कार्यकर्ता मेळाव्यात केले. तत्पूर्वी शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता हा परिश्रम घेईल, असा विश्वास त्यांनी प्रतिक्रिया व्यक्त करताना दिला.

धुळे शहरातील अग्रवाल भवनात कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील, माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार सुभाष भामरे, आमदार अमरीशभाई पटेल, आमदार जयकुमार रावल, माजी आमदार राजवर्धन कदमबांडे, महापौर प्रदीप करपे, संजय शर्मा, सुरेश पाटील, जिल्हा परिषद सदस्य राम भदाणे, भीमसिंह राजपूत यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोरोना काळात जनतेची सेवा करणाऱ्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले. कोरोना काळात इतर पक्षांचे कार्यकर्ते हे घरात बसलेले होते. मात्र भाजपाचा कार्यकर्ता हा जनतेला सेवा देण्यासाठी पुढे होता. यातून कार्यकर्त्यांनी सेवाभावाचा संदेश दिला आहे. भारतीय जनता पार्टीमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला न्याय देण्याचे काम केले जाते. राज्यामध्ये या पुढील कालावधी हा निवडणुकांचा आहे. यात पंचायत समित्यांपासून लोकसभेपर्यंतच्या निवडणुका होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या दोनशे दिवसांच्या कालावधीमध्ये कार्यकर्त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी कंबर कसली पाहिजे. या निवडणुकीत महाराष्ट्रातून लोकसभेच्या 45 पेक्षा जास्त आणि विधानसभेच्या 200 पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी प्रत्येकाला परिश्रम घ्यावे लागणार आहे, असे त्यांनी सांगितले.

या पुढील कालावधीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांना कार्यकर्ताच मिळू नये अशी परिस्थिती भाजपाच्या कार्यकर्त्यांनी निर्माण केली पाहिजे. यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने भाजपामध्ये प्रवेश घडवून आणण्याचे प्रयत्न केले पाहिजे. भारतीय जनता पार्टीची एक कार्यकर्ता 20 घर अशी नवीन योजना आहे. यात एका कार्यकर्त्यांनी केवळ वीस घरे सांभाळायचे आहे. या घरांना शासकीय योजनांची माहिती देत असतानाच त्यांना मदत करण्याचे धोरण स्वीकारावे लागणार आहे असेही त्यांनी सांगितले. धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीत यापूर्वी आपण 50 पेक्षा जास्त असा नारा देऊन या जागा जिंकल्या. पण यापुढील कालावधीत आता 65 पेक्षा जास्त जागा भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निवडून आणण्यासाठी काम करावे लागणार असल्याचे देखील त्यांनी सांगितले.

शिंदे गटाच्या प्रत्येक उमेदवारासाठी शक्तीपणाला लावू

दरम्यान यावेळी प्रतिक्रिया देताना त्यांनी राज्यात भाजपा सोबत आलेल्या मुख्यमंत्री शिंदे यांच्या शिवसेनेच्या प्रत्येक उमेदवाराला निवडून आणण्यासाठी संपूर्ण शक्ती पणाला लावली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. या पुढील काळात शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीची युती ही अधिक मजबूत राहील असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

हेही वाचा :

Back to top button