धुळे : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची चार लाखांची रोकड लंपास | पुढारी

धुळे : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याची चार लाखांची रोकड लंपास

धुळे; पुढारी वृत्तसेवा : सेवानिवृत्त कर्मचाऱ्याच्या दुचाकीच्या डिक्की मधील चार लाख रुपये तिघांनी लांबवल्याची घटना धुळ्यात घडली आहे. या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

धुळे शहरातील शिवशक्ती कॉलनीमध्ये विकास ओंकार भावसार हे राहतात. त्यांचा मोठा मुलगा पुणे येथे राहतो. या मुलाला घराचे बांधकाम करावयाचे असल्याने त्याने वडिलांकडे पैशांची मागणी केली होती. त्यानुसार विकास भावसार यांनी त्यांच्या खात्यातून साडेतीन लाख रुपये काढले. त्यांच्या जवळ असलेली पन्नास हजार आणि बँकेतून काढलेली रक्कम अशी एकूण चार लाखाची रोकड त्यांनी त्यांच्या गाडीच्या डिक्कीत ठेवली. ही रक्कम घऊन ते पारोळा रस्त्याने घरी निघाले. यादरम्यान जुन्या महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावराजवळ आल्यानंतर अंगावर काहीतरी पडले म्हणून थांबले.  दोन तरुणांनी त्यांना मदत करण्याचे नाटक करून त्यांची रक्कम पळवली.

ही बाब भावसार यांच्या निदर्शनास आली. मात्र तोपर्यंत या भामट्यांनी घटनास्थळावरून पलायन केले होते. त्यामुळे भावसार यांनी शहर पोलीस ठाणे गाठून या घटनेची माहिती दिली. त्यानुसार शहर पोलीस ठाण्यात भादवि कलम 420, 34 अन्वये संशितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा

Back to top button