Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले | पुढारी

Rain update : मुसळधार पावसाने नाशिकला झोडपले

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने बुधवारी (दि. 7) मुसळधार हजेरी लावत नाशिक शहराला झोडपून काढले. यामुळे गणेशभक्तांना घराबाहेर पडता आले नाही. तर दुसरीकडे गणेश मंडळांना देखावे सुरक्षित ठेवण्यासाठी धावपळ करावी लागली. दरम्यान आज (दि. 8) सकाळी साडेसातच्या सुमारास शहरातील अनेक भागात पुन्हा जोरदार पाऊस बरसला. सकाळपासून नाशिकमध्ये सर्वत्र ढगाळ वातावरण आहे.

श्री गणेशाची प्रतिष्ठापना झाल्यानंतर पावसाने उघडीप घेतली. यामुळे गणेश मंडळांबरोबरच गणेशभक्तांनाही काहीसा दिलासा मिळाला. शेवटच्या चरणातील पाच दिवसांसाठी जिल्हा प्रशासनाने रात्री 12 पर्यंत देखावे, आरास पाहण्यासाठी परवानगी दिल्याने नागरिकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली. सोमवारी आणि मंगळवारी नाशिककरांनी हजारोंच्या संख्येने गणेश देखावे पाहण्यासाठी गर्दी केली होती. मंगळवारी (दि. 6) शहरात काही प्रमाणात पावसाने रात्री हजेरी लावल्याने गणेशभक्तांची धावपळ झाली. परंतु, काही वेळाने पाऊस उघडल्याने दिलासा मिळाला. मात्र, बुधवारी (दि. 7) सायंकाळपासूनच पावसाने शहरात मुसळधार हजेरी लावल्याने चाकरमान्यांची धावपळ झाली. रात्री गणेश मंडळांनी उभारलेले देखावे पाहण्याचे नियोजन केलेल्या नागरिकांचा काही प्रमाणात हिरमोड झाला. शहरात काही वेळातच अनेक ठिकाणी पाणीच पाणी झाले. यामुळे मुंबईनाका, द्वारका सर्कल, मायको सर्कल, सिटी सेंटर मॉल, शालिमार, अशोकस्तंभ, रविवार कारंजा, पंचवटी कारंजा या काही भागांत वाहतूक कोंडी निर्माण झाली.

पावसामुळे सिडको तसेच सातपूर भागातील काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला. गणेश मंडळांनी उभारलेल्या देखाव्यांच्या ठिकाणी पावसाच्या पाण्यामुळे कार्यकर्त्यांची धावपळ उडाली. पावसापासून बचाव करण्यासाठी मंडळांना शर्थीचे प्रयत्न करावे लागले. अचानकपणे सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे गणेश मंडळांकडून करण्यात आलेले आरती तसेच इतरही प्रकारचे नियोजन कोलमडले.

हेही वाचा :

Back to top button