नाशिक : सटाणा ग्रामीण रुग्णालयातील गर्भपाताबद्दल समितीकडून चौकशी

नाशिक (सटाणा) : पुढारी वृत्तसेवा
येथील ग्रामीण रुग्णालयात अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर याबाबत रुग्णालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी शनिवारी (दि. ३) सातसदस्यीय चौकशी समिती दिवसभर रुग्णालयात तळ ठोकून होती. या समितीकडून सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांसह पीडित मुलगी व नातेवाइकांची सविस्तर चौकशी करण्यात आली.
येथील ग्रामीण रुग्णालयात तालुक्यातील 17 वर्षीय अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आल्यानंतर जिल्हा चिकित्सक डॉ. अशोक थोरात यांच्या नेतृत्वाखाली चौकशी समिती नेमण्यात आली होती. शनिवारी (दि. ३) सकाळी ही समिती ग्रामीण रुग्णालयात दाखल झाली. या समितीने अतिशय गोपनीय पद्धतीने दिवसभर संपूर्ण यंत्रणेची सखोल चौकशी केली. चौकशीत आढळलेल्या सर्व बाबींचा अहवाल जिल्हास्तरावर वरिष्ठांना सोपविण्यात येणार असून, कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार पुढील कार्यवाही करण्यात येईल, असे सांगण्यात आले. समितीत डॉ. थोरात यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुनील राठोड, डॉ. आनंद पवार, डॉ. एल. एन. चव्हाण, डॉ. मंदाकिनी बर्वे, डॉ. नीलेश लाड व कायदेतज्ज्ञ ॲड. सुवर्णा शेफाळ आदींचा समावेश आहे. त्यांच्या अहवालानुसार वरिष्ठांकडून सोमवारी (दि. ५) सायंकाळपर्यंत निर्णय होईल.
शिवसैनिकांनी घेतली भेट
शिवसेनेच्या वतीने समितीच्या सदस्यांची भेट घेऊन रुग्णालयातील कारभाराबाबतही तक्रारी करण्यात आल्या. शिष्टमंडळात शिवसेनेचे शहरप्रमुख जयप्रकाश सोनवणे, शरद शेवाळे, बापू कर्डिवाल, राजनसिंग चौधरी, पप्पू शेवाळे, सचिन सोनवणे आदी सहभागी होते.
हेही वाचा:
- Palghar : तारापूर अणुऊर्जा केंद्रावर तैनात असलेला CISF जवान बेपत्ता
- बोगस दस्त नोंदणी करणार्यांंवर गुन्हा; बोगस गुंठेवारी, एन.ए. ऑर्डर जोडून केली बनावट दस्त नोंदणी
- Mehangai Par Halla Bol: रामलीला मैदानावर आज ‘महागाईवर हल्ला बोल’ रॅली