बोगस दस्त नोंदणी करणार्‍यांंवर गुन्हा; बोगस गुंठेवारी, एन.ए. ऑर्डर जोडून केली बनावट दस्त नोंदणी | पुढारी

बोगस दस्त नोंदणी करणार्‍यांंवर गुन्हा; बोगस गुंठेवारी, एन.ए. ऑर्डर जोडून केली बनावट दस्त नोंदणी

पुणे; पुढारी वृत्तसेवा: हडपसर येथील मेगा सेंटरमधील सहायक दुय्यम निबंधक कार्यालयात जागेचा दस्त नोंदणी करताना दलालांमार्फत बनावट कागदपत्रे सादर करून दस्त नोंदणी करणार्‍यावर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. बनावट गुंठेवारी, बनावट अकृषिक दाखले (एन. ए. ऑर्डर) जोडून फसवणूक केल्याप्रकरणी 19 जणांविरोधात पोलिसांनी तब्बल सात गुन्हे दाखल केले आहेत. खासगी दलालांनी राज्य शासनासह पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या बांधकाम विभाग, तसेच उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

दरम्यान, एकाच वेळी फसवणूक झाल्याचे एवढे प्रकार समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी तपासासाठी विशेष पथक कार्यान्वित केले जाणार आहे. याबाबत विष्णू तुकाराम आम्ले (रा. फुरसुंगी) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार नंदा नामदेव निंबाळकर, अमोल नामदेव निंबाळकर, अजित नामदेव निंबाळकर, सोनाली अतुल निंबाळकर आणि महेश ओमप्रकाश धुत (रा. लेकटाऊन सोसायटी, कात्रज ), तसेच त्यांना बेकायदा कामासाठी मदत करणार्‍या दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महापालिकेच्या हडपसर कार्यालयात नोंदविण्यात आलेल्या दस्तास जोडण्यात आलेल्या कागदपत्रांच्या सत्यता, वैधता कायदेशीर बाबींसाठी, तसेच खोटे आढळल्यास नोंदणी अधिनियमाचे कलम 82 अन्वये संपूर्ण जबाबदार असल्याचे प्रतिज्ञापत्र देण्यात आले आहे. ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे प्राथमिक तपासात आढळून आले. या व्यवहारात सहायक दुय्यम निबंधक आणि पुणे महापालिकेच्या बांधकाम विकास विभागाची फसवणूक करण्यात आली आहे.

अशाच पद्धतीने बनावट एन. ए. दाखले जोडून फसवणूक केल्याप्रकरणी सावळाराम भीमाजी कर्‍हे, सीताराम कर्‍हे, मंगल कर्‍हे, मंगल कोळपे, अंजना बापू कोळपे, बायडाबाई जालिंदर मिसाळ, लता राजाराम कोळपे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट गुंठेवारी नियमितीकरणाच्या प्रकरणाचा दाखला जोडून दुय्यम निबंधक व पिंपरी-चिंचवड महापालिकेचे कार्यकारी अभियंता यांची फसवणूक केल्याबद्दल अरुण कृष्णा अल्हाट, पुष्पवती सोनवणे, विजया मुकुंदा साळवे, कल्पना खंडूजी कदम यांच्यातर्फे कुलमुख्यातर म्हणून सुशांत अनिल पाटील यांच्यासह इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सिद्धनाथ डेव्हलपर्सतर्फे जहांगीर हुसेन हमजुद्दीन मुल्ला (रा. आंबेगाव बु.) यांच्या विरोधात आणि श्री साई स्वराज डेव्हलपर्सतर्फे भागीदार पोपट बबन पायगुडे (रा. कात्रज) आणि हेमचंद सोमनाथ भाटी (रा. कात्रज) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दस्ताला बनावट दाखले जोडून उपविभागीय दंडाधिकारी हवेली यांची फसवणूक केल्याप्रकरणी समीर गोविंद कडू (रा. सुखसागरनगर, कात्रज) व त्यांना मदत करणार्‍यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तसेच सातव पाटील एंटरप्रायसेसतर्फे निखिल किसन सातव (रा. वाघोली) आणि त्यांना मदत करणार्‍यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याबाबत काही दिवसांपूर्वी हडपसर पोलीस ठाण्यात तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार पडताळणी समिती नेमण्यात आली होती. या समितीने अहवाल दिल्यानंतर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले.

दस्त नोंदणी करताना सहायक दुय्यम निबंधक कार्यालय हडपसर येथे बनावट कागदपत्रे सादर करून फसवणूक केल्याप्रकरणी पोलिस ठाण्यात तक्रारी अर्ज दाखल झाले होते. दाखल तक्रार अर्जाची चौकशीअंती हे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. 19 जणांच्या विरुद्ध सात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

– दिगंबर शिंदे, गुन्हे निरीक्षक हडपसर पोलिस ठाणे

Back to top button