Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर | पुढारी

Nashik Sinner : भिंत खचली, चूलही विझली; संसार आला उघड्यावर

सिन्नर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
सरस्वती नदीच्या पुराने लगतच्या दुकानदारांसह झोपडपट्टीवासीयांचे सर्वाधिक नुकसान झाले. झोपडपट्टीतील अनेक रहिवाशांचे संसार उघड्यावर आले. आसपासच्या दुकानांच्या शेडमध्ये रात्र काढत सकाळी आपला फाटला-तुटला संसार गोळा करायला सुरुवात केली. शुक्रवारी (दि.2) सकाळी नाशिक-पुणे महामार्गाच्या कडेला अपना गॅरेज झोपडपट्टी परिरासत मन खिन्न करणारे चित्र बघायला मिळाले.

देवी मंदिरापासूनच्या नदीलगतच्या घरांची मागची बाजू पुरात वाहून गेली. संसारच वाहून गेल्याने अबालवृध्द केवळ अंगावरच्या कपड्यांवर होते. खायला अन्न आणि प्यायला पाणीदेखील नव्हते. आभाळच फाटले असल्याने आता सांधण्याजोगे काहीच उरले नव्हते. तरीही नदीच्या पुराएवढेच दु:ख गिळून झोपडपट्टीवासीय उरलीसुरली भांडी, पोरासोरांची वह्या, पुस्तके गोळा करीत होते. बाया बापड्यांचा हा आटापिटा मन हेलावून टाकत होता. मन कणखर करुन रात्रभर दाबलेलं दु:ख व्यथा मांडताना आपोआप आसवांतून बाहेर पडत होते. असहाय्य झालेल्या दु:खी, कष्टी नजरा चिखलमातीत पडलेल्या चीजवस्तू आणि पडक्या भिंतीवर भिरभिरत होत्या.

सिन्नर : सरस्वती नदीकिनारी असलेल्या घरांचे पुरात झालेले नुकसान.

भिंत खचली होती…चूल विझली होती. चिंतेचे ढग दाटून आल्याने अधूनमधून आसवांचा पाऊस सुरुच होता. हे चित्र पाहून नागरिकांनाही गलबलून येत होते. काय करावे सूचत नसले तरी आता हात पसरवण्याशिवाय हातात दुसरे काहीच उरले नव्हते. उघड्यावरचा संसार पहायला येईल, त्या प्रत्येकला ‘आता काहीच उरलं नाही, बघा आम्हाला काही मिळतंय का?’ अशी आर्जवी मागणी केली जात होती. सेवाभावी संस्थांनी प्रेमाने दोन घास भरवले. त्यातच समाधान मानले जात होते. पण उद्याची चिंता चेहर्‍यावर तशीच दिसत होती.

दुकानदारांचा लाखोंचा माल पाण्यात


दुकानदारांची अवस्था यापेक्षा वेगळी नव्हती. रात्री दैव बलवत्तर म्हणून जीव वाचला. मात्र सकाळी दुकानांमध्ये शिरलेल्या पुराच्या पाण्याने होत्याचे नव्हते केले होते. विक्रीसाठी आणलेला महागडा माल खराब झाला होता. लाखोंचे नुकसान सोसावे लागणार हे नक्की होते. त्यामुळेच काही जणांच्या उद्याच्या स्वप्नांचा जणू चिखल झाला होता. जड अंतकरणाने तो बाहेर काढून दुकानांची साफसफाई सुरु होती.

हेही वाचा :

Back to top button