सांगली : सत्तांतरानंतर भाजपाचे राष्ट्रवादीला तुल्यबळ आव्हान! वाळवा तालुक्यातील चित्र | पुढारी

सांगली : सत्तांतरानंतर भाजपाचे राष्ट्रवादीला तुल्यबळ आव्हान! वाळवा तालुक्यातील चित्र

इस्लामपूर; अशोक शिंदे : वर्षानुवर्षे राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या वाळवा तालुक्यामध्ये आता राष्ट्रवादीच्या विरोधात भाजपाचे तुल्यबळ आव्हान निर्माण होत आहे. राज्य व केंद्रातील भाजप सत्तेच्या पार्श्वभूमीवर तालुक्यातील शिवसेना (शिंदे गट) देखील भाजपसोबत आगामी निवडणुकांमधून आक्रमकतेने राहण्याची शक्यता दिसत आहे. अर्थात राष्ट्रवादी आणि भाजप या पक्षांच्या ताकदीला अंतर्गत कलहाची झालर आहे. वाळवा तालुक्यामध्ये सन 1985 पासून म्हणजे 35 वर्षाहून अधिक कालखंड पाहिला तर विधानसभांच्या निवडणुकांमधून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांचे वर्चस्व राहिले आहे. सलग सात विधानसभा निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. मधल्या काळामध्ये आ. जयंत पाटील यांच्या विरोधात प्रामुख्याने जि.प. आणि पं.स. निवडणुकांमधून अनेकवेळा काँग्रेससह अनेक विरोधकांनी तुल्यबळ जागा जिंकून जोरदार धक्के दिले आहेत.

केंद्र आणि राज्यात भाजपाची सत्ता आल्यापासून वाळवा तालुक्यात माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील तसेच राहुल व सम्राट महाडिक, माजी मंत्री सदाभाऊ खोत, गौरव नायकवडी, जिल्हा बँकेचे संचालक सी. बी. पाटील, माजी नगरसेवक विक्रम पाटील, माजी नगरसेवक कपिल व अमित ओसवाल, तालुकाध्यक्ष धैर्यशील मोरे आदी मंडळी येणार्‍या निवडणुकांमधून राष्ट्रवादीच्या विरोधात ताकदीने पुढे येणार आहेत. शिवसेनेचे आनंदराव पवार यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी असलेली सलगी आणि अलीकडे अनेकविध कारणाने राष्ट्रवादी नेत्यांशी त्यांचा उफाळलेला अंतर्गत संघर्ष पाहता पवार हे देखील भाजप बरोबर असतील.

अलीकडे राष्ट्रवादीच्या नेत्यांबरोबर माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील गट अधिकच आक्रमक झाला आहे. राज्यात भाजप सत्तेत नसतानाही त्यावेळी राहुल व सम्राट महाडिक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. पूर्वीपासून भाजपमध्ये सक्रिय असलेला विक्रम पाटील यांचा गट इस्लामपूर शहराच्या राजकारणात पक्षाची एक भूमिका घेऊन वावरत आहे. रयत क्रांती संघटनेच्या माध्यमातून माजी मंत्री सदाभाऊ खोत यांची भाजपशी असलेली सलगी पाहता हा एक प्रवाहदेखील भाजपचे संघटन वाढवणारा आहे.

दोन्हीकडेही पक्षांतर्गत संघर्ष…

वाळवा तालुक्याच्या व इस्लामपूर शहराच्या राजकीय प्रवाहामध्ये राष्ट्रवादी असो किंवा भाजप असो, प्रत्येक राजकीय पक्षाला अंतर्गत टोकाच्या मतभेदांची कलहाची झालर राहिली आहे, हे नुसते मतभेद नव्हे तर प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष विरोधकांशी या ना त्या कारणाने हातमिळवणी करून पाडापाडीचे राजकारणदेखील अनेकवेळा या परिसराने अनुभवले आहे. अगदी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत इस्लामपूर परिसरात गटांतर्गत वेगळ्या बैठका, वेगळे कार्यक्रम असाही भाग अधूनमधून दिसून आला. असे काही तपशील आणि संदर्भ बाजूला ठेवले…राहिले तर भाजपदेखील मोठ्या ताकदीने तुल्यबळ लढतीस सज्ज झाली आहे. अर्थात अशीच काहीशी मतभेद स्थिती राष्ट्रवादीच्या बाबतीतदेखील इस्लामपूरसह गावागावांत आहे. राष्ट्रवादीत देखील अगदी हमरी-तुमरीवर येण्यासारखे प्रकार अगदी अलीकडेदेखील घडत आहेत. या गटाला जमेची बाजू फक्त एक आहे की नेता खमक्या आहे. राजारामबापू उद्योग समुहाचे जाळे, पक्ष संघटन, विकास कामे आणि करेक्ट कार्यक्रमाचा धागा घेऊन माजी मंत्री पाटील हेदेखील राजकीय बदलांचा वेध घेऊन रणनीती राबवत आहेत.

Back to top button