नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू | पुढारी

नाशिक : शहरात 130 जणांना स्वाइन फ्लू

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्ह्यात स्वाइन फ्लू या संसर्गजन्य आजाराची तीव्रता वाढू लागल्याने मनपाचा वैद्यकीय विभाग सतर्क झाला आहे. आतापर्यंत या आजाराने 16 जणांचा मृत्यू झाला आहे. यात नाशिक शहरातील सहा, तर ग्रामीण भागातील चौघा रुग्णांचा समावेश असून, नगर जिल्ह्यातील पाच आणि पालघरमधील एकाचा नाशिकमध्ये उपचार घेताना मृत्यू झाला आहे. ऐन गणेशोत्सवात या आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन मनपाने केले आहे.

महापालिकेने मनपा रुग्णालयांसह शहरातील खासगी तसेच खासगी रुग्णालयांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे स्वाइन फ्लूच्या संसर्गाविषयी माहिती जाहीर केली आहे. कोरोना महामारीनंतर दोन वर्षांनी प्रथमच निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा केला जात आहे. परंतु डेंग्यू, स्वाइन फ्लू आणि चिकुनगुणिया या आजारांमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. उत्सवामुळे सध्या बाजारपेठांमध्ये मोठ्या प्रमाणावर गर्दी होताना दिसत आहे. या गर्दीमध्ये लक्षणे असलेल्या नागरिकांनी फिरू नये तसेच तत्काळ उपचार घेत स्वत:ची काळजी घेण्याचे आवाहन मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले आहे. कोरोना आणि स्वाइन फ्लूची लक्षणे एकसारखीच असल्याने कोरोनामुळे गेली दोन वर्षे स्वाइन फ्लूचा संसर्ग दिसून आला नव्हता. मात्र, आता एकीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असून, दुसरीकडे मात्र स्वाइन फ्लूचे रुग्ण वाढत असल्याचे दिसून येत आहे.

साथरोगाची लक्षणे दिसून आल्यास नागरिकांनी तत्काळ वैद्यकीय उपचार घेणे गरजेचे आहे. ताप, घसा दुखणे व खवखव होणे, खोकला, सर्दी, अंगदुखी यासारखे लक्षणे आढळून आल्यास घाबरून न जाता वैद्यकीय सल्ला घेतला पाहिजे. ज्येष्ठ नागरिक तसेच मधुमेह, रक्तदाब असणारे तसेच गरोदर महिलांनी अधिक काळजी घ्यावी. – डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त.

गणेश मंडळांना सतर्कतेचे आवाहन
आतापर्यंत शहरातील 130 जणांना या आजाराची लागण झाली आहे. 16 जणांचा मृत्यू झाला आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता महापालिका प्रशासनाने तातडीने उपाययोजना सुरू केल्या आहेत. स्वाइन फ्लूग्रस्तांची माहिती महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविणे खासगी रुग्णालयांना मनपा प्रशासनाने बंधनकारक केले आहे. गणेश मंडळे, तसेच आयोजकांनी गर्दीवर नियंत्रण करण्यासाठी उपाययोजना करण्याबाबत मनपाने सूचना केली आहे. स्वाइन फ्लू, कोविड या साथरोगाच्या प्रतिबंधाबाबतच्या सूचनांचे मंडळांनी पालन करत त्याविषयी जनजागृती करण्याचे आवाहन केले आहे.

हेही वाचा:

Back to top button