कोल्हापूर : जिल्ह्यातील 4000 ज्येष्ठांनी घेतला एस.टी. मोफत प्रवासाचा लाभ | पुढारी

कोल्हापूर : जिल्ह्यातील 4000 ज्येष्ठांनी घेतला एस.टी. मोफत प्रवासाचा लाभ

कोल्हापूर; पुढारी वृत्तसेवा :  देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्यातील 75 वर्षांवरील नागरिकांना एसटीतून मोफत प्रवास करण्याच्या घोषणेनंतर ज्येष्ठांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळू लागला आहे. गेल्या चार दिवसांत जिल्ह्यातील सुमारे 4 हजारांच्यापेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिकांनी एसटीच्या मोफत प्रवासाचा लाभ घेतला आहे. तर राज्यात सुमारे 1 लाख 51 हजारांहून अधिक ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घेतला आहे.

राज्य शासनाने 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांना एसटीच्या सर्व सेवांमधून मोफत प्रवास तर 65 ते 75 वर्षादरम्यानच्या नागरिकांनाही सर्व सेवांमधून 50 टक्के सवलतीमध्ये प्रवास करता येईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अधिवेशनात केली होती. 26 ऑगस्टपासून या योजनेचा प्रारंभ झाला होता. या योजनेंतर्गत ज्येष्ठ नागरिकांना महाराष्ट्राच्या हद्दीपर्यंत कुठेही मोफत प्रवास करता येणार आहे. ही योजना सुरू झाल्यामुळे जिल्ह्यातील 75 वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांतून चांगला प्रतिसाद मिळत आहे. दररोज 1 हजारांपेक्षा अधिक ज्येष्ठ नागरिक प्रवास करत आहेत. त्यामुळे एसटीच्या भारमानात वाढ झाली आहे. विशेष म्हणजे एसटीच्या स्लीपर सीटर बसेसला यापूर्वी ही सेवा लागू नव्हती, पण आता ही योजना लागू झाली आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना राज्यांतर्गत लांबचा प्रवास करता येणार आहे.

Back to top button