नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड | पुढारी

नाशिक: अमेरिका, चीनपेक्षा भारतातील महागाई कमी : केंद्रीय अर्थराज्यमंत्री भागवत कराड

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

सध्या देशभरात महागाईने सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले असले तरी, केंद्रीय अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांच्या मते अमेरिका, चीन या देशांच्या तुलनेत भारतातील महागाई कमी आहे. त्यांच्या मते, कोरोनानंतर आपली अर्थव्यवस्था सुधारत आहे. देशात महागाई आहे, मात्र जगाच्या तुलनेत महागाई कमी आहे. शिवाय अमेरिका, चीन यांच्या महागाईदरापेक्षा देशातील महागाई दर कमी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

नाशिकमध्ये अखिल भारतीय महानुभाव संमेलनाच्या समारोपासाठी आलेले ना. डॉ. कराड भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. याप्रसंगी त्यांनी भाजपच्या काही स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या भेटीगाठीदेखील घेतल्या. यावेळी देशातील महागाईवर विचारले असता त्यांनी जगाच्या तुलनेत भारतात महागाई कमी असल्याचे स्पष्ट केले. ग्लोबल रिसेशनचे चिन्ह नाहीत, जे रिसेशन आले आहे ते कोरोनामुळे आले असून, आता ते दूर होत आहेत. जीसटी वाढतो याचाच अर्थ महागाई कमी असून, अर्थव्यवस्था सुस्थितीत आहे. दरम्यान, निर्मला सीतारामन यांनी दोनच दिवसांपूर्वी याबाबत राज्यसभा लोकसभेत निवेदन केले आहे. तसेच सुट्या पोह्यांवर जीएसटी नसून तो ब्रँडवर आहे. पॅकेज करून विकले तर जीएसटी लागणारच, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले. याप्रसंगी त्यांनी राज्यातील भाजपच्या डबल इंजिन सरकारवर स्तुतीसुमनेदेखील उधळली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितल्याप्रमाणे निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा होत असून, त्याचा जल्लोष महाराष्ट्रातच नाही तर देशभरात असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे शहराध्यक्ष गिरीश पालवे यांच्यासह भाजप पदाधिकारी उपस्थित होते.

पंकजा मुंडे नाराज नाहीत :

पंकजा मुंडे नाराज असल्याबाबत डॉ. कराड यांना विचारले असता, त्या नाराज नाहीत. केंद्रात सचिव पातळीवर काम करत आहेत. कालच दिल्लीत एक तास भेटल्याचे ते म्हणाले. आमदार नाही, मंत्रिमंडळात स्थान कसे मिळणार? आमदार नाही म्हणून पात्र नाही असे स्पष्टीकरण पंकजा मुंडे यांनी दिल्याचे डॉ. कराड यांनी स्पष्ट केले. त्याचबरोबर दोन दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि त्यानंतर प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्या भेटीवर ना. डॉ. कराड म्हणाले की, भाजपचे काही नेते राज ठाकरे यांना भेटले, मात्र काय समीकरण येणार माहिती नाही.

राज्यात डबल इंजिन सरकार

२०१९ ला जनतेच्या मनात जे सरकार होते, तेच सरकार आता सत्तेवर आले आहे. यावेळी निवडणूक झाल्यास शिंदे गट आणि भाजप २०० पेक्षा जास्त जागा जिंकतील. मागील अडीच वर्षे वाया केले आहेत. कोरोनामुळे राज्यातील मंत्री काय करत होते, तर ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ म्हणून कुटुंब सांभाळत घरी बसले होते, असा खोचक टोला केंद्रीय राज्यमंत्री डॉ. कराड यांनी महाविकास आघाडीला लावला. सध्या राज्यात डबल इंजिन सरकार असून, विकासाला महाविकास आघाडीमुळे ब्रेक लागला होता. तो आता दूर झाला असून, राज्य पुन्हा विकासाच्या वाटेवर येणार असल्याचेही ना. डॉ. कराड म्हणाले.

हेही वाचा:

Back to top button