नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार | पुढारी

नाशिक : गणेशोत्सव काळात खासगी ट्रॅव्हल्सकडून होतेय प्रवाशांची सर्रास लूटमार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

एकीकडे गणेशोत्सवात गावी जाणाऱ्या भक्तांसाठी शासकीय स्तरावर बसेस तसेच रेल्वेमध्ये सूट दिली जात असतानाच, दुसरीकडे खासगी ट्रॅव्हल्सवाल्यांकडून अव्वाच्या सव्वा भाडे आकारून प्रवासी भक्तांची सर्रास लूट केली जात आहे. ऐन गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नियमित भाड्यांमध्ये २५ ते ३० टक्क्यांनी वाढ केल्याची माहिती समोर येत आहे.

गणेशोत्सव काळात बहुतांश नोकरदार खास सुट्या काढून आपल्या गावी जात असतात. बहुतेकांना ऐनवेळी सुट्या मिळत असल्याने, रेल्वेचे तिकीट मिळणे अवघड असते. त्याचबरोबर एसटीमध्येही गर्दी असल्याने खासगी ट्रॅव्हल्सचा पर्याय अनेकांकडून निवडला जातो. हीच संधी साधून खासगी वाहनधारक तसेच ट्रॅव्हल्स कंपन्यांनी अचानक आपल्या दरांमध्ये वाढ केली आहे. गणेशोत्सवादरम्यान खासगी ट्रॅव्हल्सकडून आकारल्या जाणार्‍या भरमसाठ दरामुळे अनेक प्रवाशांची एकप्रकारे लूटच केली जात आहे. मात्र, नाइलाजास्तव प्रवासी खासगी ट्रॅव्हल्सचा प्रवास करीत आहेत. दरम्यान, ही दरवाढ अन्यायकारक असून, राज्य परिवहन विभागानेच आता या प्रकरणी लक्ष घालण्याची गरज असल्याची मागणी समोर येत आहे.

प्रवाशांची पळवापळवी : गणेशोत्सवामुळे नवीन सीबीएस बसस्थानकामध्ये प्रवाशांची मोठी गर्दी बघावयास मिळत आहे. आरक्षित तिकीट न मिळाल्याने एखाद्या प्रवाशाने खासगी ट्रॅव्हल्सची चाचपणी केल्यास, त्याला कोणत्याही परिस्थितीत खासगी ट्रॅव्हल्सनेच प्रवास करण्यास भाग पाडले जात आहे. त्याचबरोबर, सीबीएस स्थानकात ट्रॅव्हल्सवाल्यांचे पंटरही फेरफटका मारत प्रवासी आणण्याचे काम करताना दिसतात. त्यातून या मंडळींना तिकिटाच्या तुलनेत कमिशन दिले जात आहे. त्यामुळे हे पंटर अधिक कमिशन मिळण्यासाठी प्रवाशांनाच अव्वाच्या सव्वा भाडे सांगताना दिसत आहेत. एखाद्या प्रवाशाने नकार दिल्यास त्याला कमी किमतीचे भाडे आकारून बसच्या मागील बाजूचे सीट उपलब्ध करून दिले जात आहे.

मुंबईसह, जळगाव, धुळ्याला प्रवाशी : उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार त्याचबरोबर औरंगाबाद, मुंबई, ठाणे येथील बरेच नागरिक नाशिकमध्ये स्थायिक आहेत. गणेशोत्सवानिमित्त बहुतांश मंडळी गावी जात आहेत. अशात या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अधिक भाडेवाढ करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे ही भाडेवाढ निश्चित नसून, मनात येईल त्या पद्धतीने भाडेवाढ आकारली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button