नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर | पुढारी

नाशिक : काळेवाडी, भडखांब ग्रामस्थांची जळगाव निंबायतीची वाट खडतर

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील काळेवाडी व भडखांबकडून जळगाव जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची अतिशय बिकट अवस्था झाली आहे. चिखल आणि खड्डेमय रस्त्यावरून मार्गक्रमण करणे अवघड झाले आहे.

काळेवाडी व भडखांब या सुमारे एक हजार लोकसंख्येच्या वस्त्या जळगाव (निं.) या महसुली गावात समावेश होतो. परंतु, काळेवाडी व भडखांब ते जळगाव रस्त्याची अत्यंत दुरवस्था झाली आहे. पावसाळ्यात पायी चालणेदेखील अवघड होते. रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले असल्याने गाडी चालविताना तारेवरची कसरत करावी लागते. या परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर दुग्धव्यवसाय करतात. सकाळ – संध्याकाळ दूधविक्रीसाठी शेतकर्‍यांना मालेगाव येथे ये-जा करावे लागते. भरलेल्या दूध कॅनसह गाडी चालविणे मुश्कील होते. त्यातून अनेकांचा अपघातदेखील झाला आहे. रस्ता संपूर्ण मातीचा आहे. रस्त्याच्या आजूबाजूला शेती असल्याने ट्रॅक्टर आदी वाहनांनी रस्त्याची शकले बिघडली आहेत. काळेवाडी व भडखांब येथे पहिली ते चौथी शाळा आहे. पुढील शिक्षणासाठी जळगाव (निं.) येथे विद्यार्थ्यांना पायपीट करीत जावे लागते. या विद्यार्थ्यांना खडतर प्रवास करीत शिक्षण घ्यावे लागत आहे. अनेकांचे शिक्षण अर्धवटच सुटते. दोन्ही वस्त्यांवरील ग्रामस्थांना किराणा, दळण, रेशन आदी कामानिमित्त जळगावला यावे लागते. तेव्हा गरोदर स्त्रिया, वृद्ध यांचे प्रचंड हाल होतात. या समस्येविषयी प्रशासनाला वेळोवेळी निवेदने देऊनही कोणतीही कार्यवाही झालेली नाही. निवडणुकीच्या तोंडावर लोकप्रतिनिधी आश्वासनांवर बोळवण करतात. मात्र, त्याकडे नंतर प्रत्येकाचेच दुर्लक्ष होते. येत्या दिवसांत रस्ता न झाल्यास यापुढील निवडणुकांवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवात वाड्या-वस्त्यांना दळणवळणासाठी रस्ते नाहीत, ही शोकांतिका आहे.

हेही वाचा:

Back to top button