नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी | पुढारी

नाशिक : भारती पवारांच्या कार्यालयावर धडक मोर्चा, पेन्शनर्सची हाती तिरंगा घेऊन घोषणाबाजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
जिल्हा ईपीएस 95 पेन्शनर्स फेडरेशनकडून गुरुवारी (दि.25) आपल्या विविध मागण्यांसाठी केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांच्या गंगापूर रोड येथील संपर्क कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी फेडरेशनकडून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

यावेळी निवेदनात म्हटले की, स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करताना शहिदांना जगण्याइतपत पेन्शन द्यायला हवी. आरोग्य सुविधा द्यायला हव्यात. 2013 मध्ये जेव्हा राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी खासदार होते तेव्हा राज्यसभेने नेमलेल्या समितीने ईपीएस 95 पेन्शनर्सच्या पेन्शनबाबत समिती नेमली होती. तेव्हा भगतसिंह कोश्यारी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या कमिटीने पेन्शनर्सना किमान तीन हजार रुपये पेन्शन महागाई भत्ता लागू करण्याचे व मोफत आरोग्य सुविधा देण्याची शिफारस केली होती. 2013 मध्ये भाजपचे प्रवक्ते प्रकाश जावडेकर यांनी आमचे सरकार आल्यास 100 दिवसांत पेन्शन लागू करण्याचे जाहीर आश्वासन दिले होते. मात्र, अजूनही पेन्शन लागू नसल्याने पेन्शनर्सची उपेक्षाच सुरू आहे.

जिल्ह्यात एक लाखांपेक्षा अधिक पेन्शनर्स आहेत. तसेच दिंडोरी लोकसभा मतदारसंघात, दिंडोरी, निफाड व इतर ठिकाणी सेवानिवृत्त साखर कारखान्यांतील कामगार आहेत. एसटी, वीज कर्मचारी संस्था, एच. ए. एल. एस. सी. आय. विडीकामगार, वृत्तपत्रातील पत्रकार, कर्मचारी, औद्योगिक कामगार आदी 162 आस्थापनांतील सेवानिवृत्त कामगारांना तुटपुंजी पेन्शन आहे. त्यात वाढ करून भाजपने दिलेले आश्वासन पूर्ण करावेत यासाठी फेडरेशनची भूमिका दिल्ली दरबारी मांडावी, अशी मागणी यावेळी खासदार डॉ. भारती पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.

याप्रसंगी नाशिक जिल्हा ईपीएफ पेन्शनर्स फेडरेशनचे संस्थापक अध्यक्ष राजू देसले, अध्यक्ष रमेश सूर्यवंशी, जनरल सेक्रेटरी डी. बी. जोशी, कार्याध्यक्ष चेतन पणेर, कार्याध्यक्ष सुभाष काकड, खजिनदार प्रकाश नाईक यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते.

या आहेत प्रमुख मागण्या
सर्व ईपीएफ पेन्शनर्सला दरमहा नऊ हजार पेन्शन व त्यावर महागाई भत्ता देण्यात यावा.
कोश्यारी समितीच्या शिफारशीनुसार इंटेरियम महागाई भत्त्यासहीत द्यावा.
सर्वोच्च न्यायालयातील निर्णयाची अंमलबजावणी करून पेन्शनरला त्याचा मोबदला द्या.
देशात पेन्शनरांना क्रॉनिक सिकनेससहित मोफत औषधोपचार सुविधा द्या.
सिनिअर सिटिझन ईपीएफच्या निवृत्त पेन्शनर्संना रेल्वे प्रवासात
50 टक्के सवलत द्या
186 युनिटमधील सर्व कर्मचार्‍यांना ईपीएफ योजनेस सहभागी करून मोबदला मिळावा.

हेही वाचा :

Back to top button