रस्त्यावरून वाहते सांडपाणी; वाघोली-केसनंद रोडवरील मंदिराकडे दर्शनासाठी जाणार्‍यांना त्रास | पुढारी

रस्त्यावरून वाहते सांडपाणी; वाघोली-केसनंद रोडवरील मंदिराकडे दर्शनासाठी जाणार्‍यांना त्रास

वाघोली; पुढारी वृत्तसेवा: वाघोली-केसनंद रोडवरील सोसायटीने महादेवाच्या मंदिराकडे वनविभागाच्या हद्दीतून जाणार्‍या रस्त्यावर मैला व सांडपाणी सोडल्यामुळे दर्शनासाठी जाणार्‍या भाविकांना त्रास सहन करावा लागत आहे. दुर्गंधीयुक्त मैलापाणी रस्त्यावर टाकल्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित सोसायटीवर योग्य कारवाई करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक सागर सातव यांनी लेखी निवेदनाद्वारे मनपा आरोग्य व वनविभागाकडे केली आहे.

वाघोली-केसनंद रोडवर हिल शायर सोसायटी आहे. सोसायटीलगत वाघोली-केसनंद गावाची सीमा असून, वनविभागाच्या हद्दीत (गट नं. 864) महादेवाचे मंदिर आहे. श्रावण महिना असल्याने परिसरातील भाविक महादेवाच्या दर्शनासाठी जातात. परंतु हिल शायर सोसायटीने मंदिराकडे जाणार्‍या रस्त्यावर मैलापाणी व सांडपाणी सोडले आहे. त्यामुळे भाविकांना दर्शनासाठी जाताना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. आधीच डेंगू आजाराने डोके वर काढले असताना उघड्यावर दुर्गंधीयुक्त पाणी सोडल्यामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

संबंधित सोसायटीच्या व्यवस्थापकाशी संपर्क केला असता, हे पाणी रस्त्यावर येऊ नये यासाठी लवकरच उपाययोजना करण्यात येईल व हे दुर्गंधीयुक्त पाणी काढून टाकण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले. मनपा वाघोली संपर्क कार्यालयाचे आरोग्य निरीक्षक यांना संपर्क केला असता, संबंधित सोसायटीची प्रत्यक्षात पाहणी करून योग्य कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. वनविभागाच्या हद्दीत मैला व सांडपाणी सोडल्याने याप्रकरणी वनविभागाचे अधिकारी बी. एस. वायकर यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

Back to top button