यंदाचा गणेशोत्सवात चाकरमान्यांची दमछाक!

यंदाचा गणेशोत्सवात चाकरमान्यांची दमछाक!
Published on
Updated on

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनी गणेशोत्सवात कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांना यंदा वेगवेगळ्या संकटांना तोंड द्यावे लागत आहे. रेल्वे, एसटी फुल्ल झाल्याने चाकरमानी खासगी ट्रव्हल्सने आपले गाव गाठण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु खासगी ट्रव्हल्सने तिकिटाचे दर वाढविल्याने चाकरमान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. तर दुसरीकडे मुंबई-गोवा मार्गाची खड्यांमुळे चाळण झाल्याने प्रवास देखील धोकादायक झाला आहे.

मध्य रेल्वेतर्फे गणेशोत्सवाकरिता नियमित गाड्यांसोबत 216 विशेष गाड्या चालविण्यात येत आहेत. तर एसटी महामंडळाच्या सुमारे तीन हजार 200 गाड्या फुल्ल झाल्या आहेत. त्यामुळे चाकरमान्यांना रेल्वे, एसटीचे तिकिट मिळेनासे झाले आहे. तिकिट मिळत नसल्याने चाकरमान्यांनी खासगी ट्रव्हल्सकडे आपला मोर्चा वळविला आहे. परंतु याकरिता प्रवाशांना अव्वाच्यासव्वा भाडे मोजावे लागत आहे. मुंबई, ठाण्यातून रत्नागिरी, सिंधुदुर्गपर्यंत एसी स्लीपर बसकरिता दोन हजार 200 ते अडीच हजार रुपये भाडे आकारण्यात येत आहे. चिपळूण, कणकवली, सावंतवाडी, नागपूर, कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी जाणार्‍या बसचा प्रवास देखील महाग झाला आहे. अन्य पर्याय उपलब्ध नसल्याने अनेकांना नाईलाजाने खिशाला कात्री लावून कोकणाची वाट धरावी लागत आहे.

गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत यंदा कोकणात जाण्यासाठी एकच झुंबड उडाली आहे. रेल्वे, एसटीचे तिकिट मिळत नसल्याने वैयक्तिक वाहन घेऊन जाणार्‍यांचीही संख्या यावेळी जास्त आहे. परंतु मुंबई-गोवा मार्गावर खड्डेच खड्डे असल्याने प्रवाशांच्या सुरक्षित प्रवासाचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. सध्या मुंबई-गोवा महामार्गावर 24 ठिकाणी खड्डे आहेत. यामध्ये सर्वाधिक वाकण पट्ट्यात आठ आणि महाड पट्ट्यात सात ठिकाणी, तर पळस्पे, कशेडी, चिपळूण या पट्ट्यातही खड्डे मोठया प्रमाणात आहेत. मुंबई-गोवासह अन्य महामार्गावरून कोकणाकडे जाणार्‍या रस्त्यांवरही खड्डे आहेत.

महामार्ग पोलिसांची कसरत

दुरुस्तीसंबधित विभाग खड्डे-रस्ते गणेशोत्सव सुरू होण्यापूर्वी 27 ऑगस्टआधी भरून घ्यावे असे निर्देश महामार्ग पोलिसांकडून देण्यात आले आहेत. गेल्या काही वर्षापासून कोकणात जाणारे वाहनचालक मुंबई-पुणे कोल्हापूर मार्गाचाही मोठया प्रमाणात वापर करतात. कोल्हापूर येथून गगनबावडा घाट, आंबा घाट तसेच आंबोली घाटापर्यंत जाणार्‍या रस्त्यावरही खड्डे असून त्याकडेही लक्ष देण्याचे निर्देश दिले आहेत.

गणेशोत्सवकाळात वाढणारी वाहतूक पाहता घाट परिसरातच आपतकालीन यंत्रणा आणि मनुष्यबळ 24 तास कार्यरत राहणार आहे. पाऊस अद्याप सुरू असून वाहतूक कोंडी, दरड कोसळून वाहतूक पूर्णपणे बंद होण्याची शक्यता असल्याने येथील परिस्थिती हाताळण्यासाठी यंत्रणा कार्यरत राहणार आहे.

या मार्गात खड्डे

पळस्पे -रामवाडी ते वाशी नाका, वाशी नाका ते वडखळ बायपास ब्रिजच्या सुरुवातीपर्यंत, वडखळ गावाजवळून जाणारा मार्ग.
वाकण-निगडे ब्रिज ते आमटेम गाव, एच. पी. पेट्रोलपंप कोलेटी ते कोलेटी गाव, कामत हॉटेल नागोठणे ते गुलमोहर हॉटेल चिकणी, वाकण फाटापासून सुमारे 100 मिटर पुढे, सुकेळी खिंड, पुई गाव येथील म्हैसदरा ब्रिज, कोलाड रेल्वे ब्रिज ते तिसे गाव, रातवड गाव.
महाड- सहील नगर, दासगाव, टोलफाटाच्या अलीकडे, वीर रेल्वे स्टेशन समोर, मुगवली फाटा, एच. पी पेट्रोलपंप ते नागलवाडी फाटा, राजेवाडी फाटा. कशेडी- पोलादपूर सडवली नदी ब्रिज ते खवटी अनुसया हॉटेलपर्यंत, भरणे नाका खेड येथील उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूस. चिपळूण- परशुराम घाट, बहादूर शेख नाका ते चिपळूण पॉवर हाऊस, आरवली एसटी स्टॅन्ड, संगमेश्वर ते बावनदीपर्यंत.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news