नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला ; अशी घ्या काळजी | पुढारी

नाशिकमध्ये स्वाइन फ्लूचा धोका वाढला ; अशी घ्या काळजी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
कोरोनाच्या एका पाठोपाठ येणार्‍या लाटा संपत नाही, तोच स्वाइन फ्लूने वेग धरल्याने शहरातील बहुतांश दवाखाने रुग्णांनी फुल्ल भरले आहेत. काही खासगी रुग्णालयात तर खाटा मिळणे अवघड झाले आहे. शहरात ऑगस्ट महिन्याच्या अवघ्या तीनच आठवड्यांत स्वाइन फ्लूचा उद्रेक झाला असून, नागरिकांनी अधिक सतर्कता बाळगण्याची गरज आहे. बहुतांश लोक लक्षणे असूनदेखील वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेत नसल्याने स्वाइन फ्लूचा धोका वाढत आहे.

स्वाइन फ्लू हा सामान्य ‘फ्लू’सारखा असल्याने त्याची लक्षणेदेखील सामान्य तापासारखीच आहेत. त्यामुळे बहुतांश लोक त्याकडे दुर्लक्ष करीत असल्याने त्याचा उद्रेक वाढत आहे. खोकला, सर्दी किंवा स्वाइन फ्लूने संक्रमित व्यक्तीने स्पर्श केलेल्या वस्तूंना हात लावल्यानेही संसर्ग पसरण्याची शक्यता असल्याने, कोरोनासारखाच या आजाराचाही उद्रेक होऊ शकतो. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्याची गरज निर्माण झाली आहे. स्वाइन फ्लूचा विषाणू नाक, डोळे आणि तोंडावाटे शरीरात प्रवेश करतो. स्वाइन फ्लू श्वसननलिकेत होणारा संसर्ग असल्याने या काळात मास्क वापरण्याचा सल्ला आता तज्ज्ञांकडूनच दिला जात आहे. सध्या मास्क वापरण्याची सक्ती नसली तरी, ज्या वेगाने स्वाइन फ्लूचा आजार पसरत आहे, त्यावरून तज्ज्ञांकडूनच मास्कसह पुरेशी काळजी घेण्याबाबतच्या नागरिकांना सूचना केल्या जात आहेत.

स्वाइन फ्लूची लक्षणे
एच1एन1 या स्वाइन फ्लूच्या विषाणूने शरीरात प्रवेश केल्यास सात दिवसांच्या कालवधीत रुग्ण स्वाइन फ्लूने संक्रमित होतो. विशेष म्हणजे याच काळात हा विषाणू दुसर्‍यांमध्येही पसरवू शकतो. विशेषत: लहान मुले दीर्घकाळ स्वाइन फ्लूचा संसर्ग पसरवू शकतात. हा आजाराची लक्षणे प्रामुख्याने ताप (102 ते 103 डिग्री), थंडी वाजणे, कफ आणि घसादुखी, अंगदुखी, डोकेदुखी, डोळ्यांत पाणी येणे, खूप जास्त थकवा, डायरिया, उलट्या, पोट दुखणे अशी आहेत. यातील कोणतेही तीन लक्षणे दिसून आल्यास तत्काळ वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन केले जात आहे.

वृद्ध व लहानांना धोका
स्वाइन फ्लू विषाणूचे सर्वाधिक काळ वाहक लहान मुले आणि वृद्ध ठरू शकतात. मुलांना स्वाइन फ्लूची लागण झाल्यास त्यांच्यामध्ये पुरेशी काळजी घेण्याचा अभाव असतो. अशात एकाकडून दुसर्‍या व्यक्तीला संसर्ग होण्याची दाट शक्यता असते. वृद्धांमध्येदेखील प्रतिकारशक्ती कमी असल्याने त्यांच्यात संक्रमण झपाट्याने पसरते. अशात लहान मुले आणि वृद्धांची पुरेशी काळजी घेणे गरजेचे आहे.

मधुमेह, हृदयरोग रुग्णांनी काळजी घ्यावी
स्वाइन फ्लूचा संसर्ग झालेल्या रुग्णांना न्यूमोनिया, बॅक्टेरियल न्यूमोनिया, ब—ॉन्कायटिस अशा प्रकारची गुंतागुंत होण्याची शक्यता असते. त्यामुळे मधुमेह, हृदयरोग अशा सहव्याधी असलेल्या रुग्णांची प्रकृती स्वाइन फ्लूची लागण झाल्यानंतर गुंतागुंतीची होऊ शकते. फुफ्फुसात संसर्ग आणि श्वास घेण्यास अडथळा होऊ शकतो.

हेही वाचा :

Back to top button