रत्नागिरी : महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; कोकणवासीयांचा प्रवास आता सुखकर | पुढारी

रत्नागिरी : महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; कोकणवासीयांचा प्रवास आता सुखकर

ठाणे; पुढारी वृत्तसेवा : कोकणचा गणेशोत्सव अवघ्या सहा दिवसांवर आला आहे. गणपतीकाळात महामार्गावर वाहतूक कोंडीची समस्या उद्भवू नये यासाठी अवजड वाहनांबाबत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्टदरम्यान बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उत्सावासाठी कोकणात जाणार्‍या नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरे जावे लागू नये यासाठी पोलिस आणि यंत्रणा सज्ज ठेवण्यात येणार आहे. यामुळे कोकणात जाणार्‍या चाकरमान्यांचा प्रवास आता सुखकर होणार आहे.

या वाहनांना असणार बंदी…

उत्सवकाळात वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर ज्या वाहनांची वजनक्षमता 16 टन किंवा 16 टनापेक्षा जास्त असणार्‍या अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली आहे. यामध्ये प्रामुख्याने ट्रक, मल्टी एक्सल, ट्रेलर आदी वाहनांचा समावेश असणार आहे. याशिवाय पनवेल ते इन्सुली सावंतवाडी या राष्ट्रीय महामार्गासाठी पनवेल ते सिंधुदुर्गवरून होणार्‍या वाळूच्या ट्रक, ट्रेलरच्या वाहतुकीबाबतदेखील मोटार वाहन अधिनियम, 1988 च्या कलम 1915 मधील तरतुदींचा वापर करून महाराष्ट्र शासन आदेश जारी केले आहे. दरम्यान, अवजड वाहनांच्या निर्बंधांमधून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस सिलिंडर, लिक्वीड मेडिकल ऑक्सिजन, अन्न धान्य, भाजीपाला आणि नाशवंत माल इत्यादी जीवनावश्यक वस्तू वाहून नेणार्‍या अवजड वाहनांना वगळण्यात आले आहे.

कोकणी लोकांसाठी गणेशोत्सव हा सर्वाधिक मोठा उत्सव आहे. यानिमित्त मुंबई, ठाणे, पुणे येथील बहुतांश चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात जात असतात. यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांची संख्या लक्षणीय असते. त्यात जर एखादे अवजड वाहन बंद पडले तर, त्याचा परिणाम सर्व वाहतूकीवर होतो आणि कोंडी होते. त्यामुळे नागरिकांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. या सर्व बाबी लक्षात घेता 27 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट दरम्यान मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

Back to top button