नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार; 18 गुंठे जागेची किंमत अंदाजे 16 कोटी | पुढारी

नाशिक : मनपाच्या जागेवर बिल्डरचे बांधकाम, आयुक्तांकडे तक्रार; 18 गुंठे जागेची किंमत अंदाजे 16 कोटी

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आनंदवली येथील गंगापूर रोडलगत महापालिकेच्या 18 गुंठे जागेवर बांधकाम व्यावसायिकासह मनपाच्या काही अधिकार्‍यांनी संगनमत करून बांधकाम केले असून, मनपाची अंदाजे 16 कोटी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार मनपा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे करण्यात आली आहे. त्यामुळे याबाबत आयुक्त काय भूमिका घेतात, याकडे लक्ष लागून आहे.

यासंदर्भात नाशिक शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पश्चिम विभाग अध्यक्ष अनिल चौघुले यांनी लेखी तक्रार करीत चौकशीची मागणी केली आहे. त्यानुसार आनंदवली शिवारातील भूमापन क्र. 67 या 18 गुंठे क्षेत्रफळ असलेला भूखंड गंगापूर ग्रुप ग्रामपंचायतीच्या मालकीचा होता. गंगापूर गाव नाशिक महापालिकेत विलीन झाल्यानंतर नोंद क्र. 6311 प्रमाणे संबंधित भूखंडाला नाशिक मनपाचे नाव लागल्याची बाब निदर्शनास आणून देताना चौघुले यांनी लेखी तक्रारीसोबत सातबारा उतारा व मनपाच्या डीपी प्लॅनची प्रत सादर केली आहे. मनपाचे अभियंता रवींद्र बागूल व प्रशांत भामरे तसेच बांधकाम व्यावसायिक अर्चित बिल्डर व डेव्हलपर यांनी संगनमत केल्याचा आरोप चौघुले यांनी केला आहे. संबंधितांनी स. क्र. 61 ब ला लागून असलेल्या मनपाच्या भूमापन क्र. 67 ची 18 गुंठे जागा संबंधित बिल्डरची असल्याचे दाखवून मनपाकडून व्यावसायिक इमारतीचा प्लॅन मंजूर करून घेतला आहे. मनपाच्या दोन्ही अभियंत्यांना मनपाच्या या जागेविषयी संपूर्ण माहिती असताना, मनपाची जागा हडप केली आहे. त्यामुळे मनपाची तब्बल 16 कोटींची फसवणूक झाली आहे. संबंधित जागेवर पूर्णपणे व्यावसायिक बांधकाम उभे असून, अशा प्रकारे मनपाची जागा बळकावणे ही गंभीर बाब आहे.

मनपाच्या जागेवर अशा प्रकारे परस्पर बांधकाम केल्यामुळे बिल्डिंग प्लॅनची मंजुरी आणि बिल्डरला दिलेला पूर्णत्वाचा दाखला रद्द करण्यात यावा. तसेच या प्रकरणाची शहानिशा व सखोल चौकशी होत नाही, तोपर्यंत या मंजुरीला स्थगिती देण्यात येऊन संगनमत करणार्‍या अभियंत्यांना निलंबित करण्याची मागणी चौघुले यांनी केली आहे.

संबंधित प्रकरणात आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. या तक्रारीनुसार जागेची पाहणी केली असता संबंधित जागा मनपाची असून, संबंधित बिल्डरने जागेवर काही प्रमाणात बांधकाम केल्याची बाब समोर आली आहे. त्यानुसार अर्चित बिल्डरला नोटीस बजावली आहे.
– रवींद्र बागूल, उपअभियंता, नगर रचना विभाग

हेही वाचा :

Back to top button