सातारा : खानापूरमधील पंधरा शेतकर्‍यांची फसवणूक सांगलीच्या हळद व्यापार्‍यावर गुन्हा | पुढारी

सातारा : खानापूरमधील पंधरा शेतकर्‍यांची फसवणूक सांगलीच्या हळद व्यापार्‍यावर गुन्हा

वाई; पुढारी वृत्तसेवा : खानापूर, ता. वाई येथील हळद उत्पादक शेतकर्‍यांची सांगलीच्या व्यापार्‍याकडून सुमारे 20 लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. याबाबत वाई पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, यापूर्वीही सातारा तालुका पोलिस ठाण्यात सांगलीच्याच हळद व्यापार्‍यावर असाच गुन्हा दाखल झाला असून फसवणुकीचे हे रॅकेट मोठे असल्याचे समोर येत आहे.

सन 2018 मध्ये 20 लाख रुपयांची हळद खरेदी करून व्यापार्‍याने अद्याप कसलेही पैसे दिले नसल्याची फिर्याद हळद उत्पादक शेतकरी रुपेश राजाराम काळोखे (रा. खानापूर) यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली आहे. हळद व्यापारी राजकुमार रमेशचंद्र सारडा व उर्मिला राजकुमार सारडा (दोघेही रा. गुजराती हायस्कूल जवळ सांगली, सध्या राहणार महालक्ष्मी निवास दौलतनगर सातारा) या हळद व्यापार्‍यांच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

राजकुमार सारडा व उर्मिला सारडा यांनी खानापूरमध्ये येवून दि. 12 एप्रिल 2018 रोजी मनोज जाधव यांची हळद विकत घेतली. तक्रारदार रुपेश काळोखे याला जादा दराचे आमिष दाखवून आणखी काही शेतकर्‍यांना चांगला भाव देतो सांगत 20 लाख रुपयांची हळद खरेदी केली. त्या पैशांचा चेक संबधित शेतकर्‍यांना देवून माल घेवून पोबारा केला. त्यांनी दिलेला चेक बँकेत भरला असता तो वटला नाही. अनेक वेळा पैशाची मागणी केली परंतु आजतागायत एकाही शेतकर्‍याला त्याच्या हळदीचे पैसे मिळाले नाहीत. खानापूर गावातील एकूण 15 शेतकर्‍यांची 20 लाख 4 हजार 421 रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सतीश यादव, सचिन जाधव, भानुदास जाधव, महादेव जाधव, लक्ष्मण जायगुडे, मनोज जाधव, राजाराम जाधव, दिलीप जाधव, सुरेश गायकवाड, गुलाबराव मुळीक, रुपाली जाधव, सोमनाथ जाधव, राजेंद्र साळुंखे, संपत गायकवाड, सतीश दाभाडे यांची फसवणूक झाली आहे.

Back to top button