लवंगी मिरची : दर्जा मिळेल तेव्हा कळेल! | पुढारी

लवंगी मिरची : दर्जा मिळेल तेव्हा कळेल!

गण्या, ए गण्या, अरे कुठे आहेस तू?
आलोच पपा, येतोय.
कुठून येतोयस? जिन्यावर तर दिसत नाहीयेस. पायही वाजत नाहीयेत तुझे.
हा घ्या. फक्त पायच नाहीत, मी आख्खा हजर आहे.
अरे, भुताटकी केलीस की काय? आलास तरी कुठून?
खिडकीतून!
दोन मजले भिंतीवरून चढून आलास? या घराला एक पक्का जिना बांधलाय ना रे तुझ्या बापजाद्यांनी?
जिना चढून येण्यात मजा नाही. मी घोरपडीसारखा भिंतीवरून सरपटत येऊन खिडकीतून उडी टाकली.
आणि कुठे पडझड, हातापायाची तोडमोड असं काही झालं असतं तर? आमच्या डोक्याला किती घोर लावतोस?
चिल पपा! मी एकट्याने नाही काही! सगळ्या मित्रांनी ठरवलंय, यापुढे असेच साहसाचे प्रयोग करत राहायचे.
नका रे असा अंत पाहू आयबापाचा! एरव्हीही तुमच्या उपद्वव्यापांनी काय कमी थकतो का आम्ही? रोज रात्री तुम्हाला हातीपायी धड पाहेपर्यंत जीवात जीव नसतो.
येईल तो लवकरच.
कशाने?
जिन्याऐवजी खिडकीतून घरात शिरण्याला साहसी खेळाचा दर्जा मिळाला की!
कोण द्यायला बसलंय असा दर्जा?
का? दहीहंडीला नाही मिळाला?
ती गोष्ट वेगळी होती रे सोनुल्या!
मान्य. दहीहंडीत वर चढून मडकं फोडायचं असतं, तसं भिंतीवरून चढून डोकं फोडायचं नसतं, एवढं कळतं बरं का!
तू, तुझे मित्र सर्वज्ञ आहात, मान्य; पण तुमच्या कसरती, उचापती यांना साहसी खेळांचा दर्जा का रे मिळावा?
कुछ भी हो सकता है पपा! सरकार नवं आहे, त्याला पॉप्युलर व्हायचंय, असं तुम्हीच फोनवर म्हणत होतात.
तो संदर्भ वेगळा होता रे म्हसोबा!
आम्ही लावून धरलं की कधीतरी साहसी खेळाचा दर्जा मिळेलच. मग, दोन अवयव निकामी झाल्यास वट्ट साडेसात लाख रुपये तर कुठेच गेले नाहीत पपा! आम्ही तर ठरवलंय, घालवायचेच झाले तर दोनदोन अवयव घालवायचे.
आणखी काय ठरवलंयत गुरुवर्य?
विमा तर उतरणारच आहे. थेट मृत्यू झाल्यास वारसाला दहा लाख शुअर. मी तुम्हाला वारस नेमू शकतो ना पपा?
तू या जगात काहीही करू शकतोस. मला त्याबद्दल शंका नाहीच; पण निदान अभद्र बोलू तरी नकोस माझ्यासमोर.
ओक्के. मग, भद्र बोलतो. लवकरच प्रो भिंत चढणे याचे सामने राज्यात रंगतील किंवा शासकीय सेवेतल्या पाच टक्क्यांच्या आरक्षणात भिंत चढण्याचा समावेश झाला की, माझी नोकरी पक्की होईल. कशा वाटतात या शक्यता?
मी आडवा पडू का जरा? मला थकल्यासारखं वाटतंय.
पडा खुशाल. आता नकाच त्रास घेऊ. एकदा आम्ही साहसी खेळाचा दर्जा पटकावतो. मग, सगळं आपोआप कळेल तुम्हाला.

– झटका

Back to top button