टीईटी घोटाळा : नाशिक जिल्ह्यात 39 शिक्षकांचे रोखले वेतन | पुढारी

टीईटी घोटाळा : नाशिक जिल्ह्यात 39 शिक्षकांचे रोखले वेतन

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
शिक्षक या शब्दाची ढोबळ व्याख्या ‘शि’ म्हणजे शीलवान, ‘क्ष’ म्हणजे क्षमाशील आणि ‘क’ म्हणजे कर्तृत्ववान अशी केली जाते. मात्र, राज्यात समोर आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात, टीईटी घोटाळ्याने शिक्षकांच्या या ढोबळ व्याख्येची परिभाषाच बदलली आहे. या घोटाळ्यातील सहभागी शिक्षकांवरील कारवाईची धार अधिक तीव— केली असून, नाशिक विभागातील तब्बल 179 शिक्षकांचे वेतन थांबविण्यात आल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. यामध्ये नाशिक जिल्ह्यातील 39 शिक्षकांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात, टीईटी परीक्षा घोटाळ्याने सबंध महाराष्ट्रात खळबळ उडवून दिली आहे. नाशिक विभागातील नाशिकसह जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यातील नामांकित शिक्षण संस्थांमध्ये तब्बल 179 बोगस टीईटीधारक असल्याची यादीच आता समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील 39 बोगस शिक्षकांमध्ये 27 पुरुष, तर 12 महिलांचा समावेश आहे. यात संस्थाचालकांचे काही नातलग असल्याचीही बाब समोर येत आहे. दरम्यान, प्राथमिक शिक्षण संचालनालयामार्फत शिक्षण संचालक दिनकर पाटील यांच्या आदेशान्वये वेतन व भविष्य निर्वाह निधी पथकाच्या अधीक्षकांनी वेतन थांबविण्यासंदर्भात संबंधित मुख्याध्यापकांना पत्र पाठविल्याने बोगस शिक्षकांचे धाबे दणाणले आहेत.

2019 मध्ये घेण्यात आलेल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेमधील (टीईटी) 7 हजार 874 उमेदवारांनी गैरप्रकार केल्याचे चौकशीअंती समोर आले होते. या सर्वांना सध्या अपात्र करण्यात आले आहे. या सर्व अपात्र उमेदवारांची यादी महाआयटी मुंबई यांना नावानुसार व आधार क्रमांकानुसार मॅपिंग करण्यासाठी देण्यात आली होती. प्राप्त यादीनुसार अपात्र उमेदवारांपैकी 576 उमेदवार अंशत: अनुदानित प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेमध्ये शिक्षणसेवक, शिक्षक पदावर कार्यरत असून, शालार्थ प्रणालीद्वारे वेतन अनुदान घेत आहेत. या उमेदवारांचे शालार्थ आयडी पुढील आदेशांपर्यंत गोठविण्यात आले आहेत.

या अंतर्गत नाशिक विभागातील 179 शिक्षकांवर कारवाई करण्यात आली असून, या शिक्षकांचे नाव ऑगस्ट 2022 च्या वेतन देयकामध्ये समाविष्ट असल्याने, त्यांचे नाव वगळून इतर कर्मचार्‍यांचे वेतन अनुदान अदा करण्याची कार्यवाही करावी, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच शालार्थ आयडी गोठविण्यात आलेल्या शिक्षकांचे ऑगस्ट 2022 पासून ऑनलाइन अथवा ऑफलाइन वेतन अनुदान अदा होणार नाही, याची सर्व संबंधितांनी दक्षता घ्यावी. या प्रकरणी उमेदवारांना वेतन अनुदान अथवा फरक देयक अदा झाल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित अधिनियमानुसार कारवाई प्रस्तावित केली जाईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. दरम्यान, अद्याप 2017 आणि 2018 या वर्षातील टीईटी यादी अद्याप जाहीर झाली नाही. ही यादी प्रसिद्ध झाल्यास शैक्षणिक क्षेत्रात मोठा भूकंप होईल, अशी शक्यताही वर्तविली जात आहे.

विभागातील बोगस शिक्षक
नाशिक 39
धुळे 51
जळगाव 72
नंदुरबार 17

नाशिक जिल्ह्यातील तालुकानिहाय संख्या
चांदवड 8
नाशिक 6
मालेगाव 5
नांदगाव 5
बागलाण 4
निफाड 3
देवळा 1
दिंडोरी 1
पेठ 1
सिन्नर 1
सुरगाणा 1

हेही वाचा :

Back to top button