

बुलढाणा : विजय देशमुख; भाजपचे नुतन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी नुकतीच बुलढाणा येथे जिल्हा भाजपच्या बैठकीत "बुलढाण्याचा पुढचा खासदार कमळ चिन्हावर भाजपचाच" असे वक्तव्य केल्याने जिल्ह्यातील शिवसेनेच्या शिंदे गटात अस्वस्थता पसरली. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला नवा विषय मिळाला आहे.
प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर बावनकुळेंनी पहिला दौरा शिंदे गटाचे शिवसेना खासदार प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघात केला. दोन महिन्यापूर्वी शिंदे गट व भाजपच्या युतीचे नवे सरकार आले. त्यापाठोपाठ शिंदे गटाच्या बारा खासदारांनीही शिवसेनेत बंड केले. त्यात बुलढाण्याचे प्रतापराव जाधव हे ही आहेत. आता युती झालेली असल्याने शिंदे गटाच्या विद्यमान खासदारांनाच भाजप समर्थक उमेदवारी मिळेल असे गृहीत धरले जात असतानाच भाजप प्रदेशाध्यक्षांनी 2024 मध्ये बुलढाण्याला 'कमळ' चिन्हावर भाजपचा खासदार तसेच सातही विधानसभा मतदारसंघात भाजपचे आमदार निवडून आणण्याचे पदाधिकाऱ्यांना आवाहन केले होते. हे वक्तव्य स्थानिक खासदार प्रतापराव जाधवांसह शिंदे गटाच्या दोन्ही आमदारांनाही खटकले. शिंदे गटाला सूचक इशारा देणारे हे वक्तव्य समजले जात आहे.
राज्यात भाजपने मिशन 45 अंतर्गत ज्या 16 लोकसभा मतदारसंघांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे त्यात बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा समावेश आहे. दोन आठवड्यापूर्वी भाजपच्या मिशन-45 च्या बातम्या आल्यात. त्यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला होता की, भाजप मतदारसंघनिहाय पक्षाच्या मजबूत बांधणीवर भर देणार आहेत. मात्र जेथे शिंदे गटाचे विद्यमान खासदार आहेत तेथे शिंदे गटाच्या उमेदवाराला लोकसभा निवडणुकीत भाजप मदत करेल".
त्याउलट नव्या प्रदेशाध्यक्षांचे वक्तव्य मात्र भाजपची वाटचाल स्वबळाची राहणार असल्याचे संकेत देणारे असल्यामुळे शिंदे गटात अस्वस्थता पसरली आहे. बावनकुळे यांच्या वक्तव्यावर शिंदे गटाचे बुलढाण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड म्हणाले," कदाचित भाषणाच्या ओघाओघात ते 'तसे' बोलले असावेत. पण त्यांनी तसे वक्तव्य जाणूनबुजून केले असेल तर वरिष्ठांना आमच्या भावना कळवू. यापुढे भाजप नेत्यांकडून अशी विधाने येऊ नयेत. शिवसेनेच्या शिंदे गटाचे खासदार-आमदार असलेल्या मतदारसंघात त्यांनी युतीची भाषा वापरावी. अशी अपेक्षा आ. संजय गायकवाड यांनी व्यक्त केली आहे.
हे ही वाचा :