धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना | पुढारी

धुळे : नुकसानग्रस्त पिकांचा पंचनामा करण्याचे आ. पाटील यांच्या कृषी, महसूल विभागातील अधिकार्‍यांना सूचना

धुळे : पुढारी वृत्तसेवा

सातत्याने पावसाच्या जोरदार हजेरीमुळे कपाशीसह खरीप पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अतिवृष्टीमुळे प्रभावित शेतीपिकांचा तातडीने पंचनामा करुन नुकसानीचा अहवाल शासनास पाठवावा अशा सुचना कृषी व महसूल विभागातील अधिकार्‍यांना आ.कुणाल पाटील यांनी दिल्या आहेत. तसेच शेतकर्‍यांना शंभर टक्के नुकसान भरपाई मिळण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचा पंचनामा करण्याच्या सूचना देण्यात आल्या असल्याची माहिती तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनी तातडीच्या बैठकित दिली आहे.

धुळे तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचा पंचनामा करुन भरपाईसाठी धुळे कृषी व महसुल विभागाचे अधिकारी आणि कर्मचार्‍यांची आ.कुणाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत तातडीची बैठक बोलविण्यात आली होती. देवपूर धुळे येथील आ.पाटील यांच्या संपर्क कार्यालयात बोलविण्यात आलेल्या बैठकिला तहसिलदार गायत्री सैंदाणे, तालुका कृषी अधिकारी वाल्मिक प्रकाश यांच्यासह तलाठी, मंडळाधिकारी, कृषी सहाय्यक, विमा प्रतिनिधी आणि शेतकरी उपस्थित होते. बैठकीत शेतकर्‍यांनी झालेल्या नुकसानीचा पाढाच वाचला. तसेच सततच्या पावसामुळे कपाशीसह इतर पिकांमध्ये पाणी साचल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून खरीप हंगाम पूर्णपणे हातचा गेला आहे. आ. पाटील यांनी कृषीअधिकारी व तहसिलदारांकडून तालुक्यातील नुकसानीचा आढावा घेतला. बैठकित तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनी सांगितले की, धुळे तालुक्यात ज्या मंडळ विभागात 65 एमएम एवढा पाऊस झाला आहे. त्या भागात पंचनामा करण्याच्या सूचना दिल्या आहेत. तर उर्वरित नुकसानीची माहिती घेऊन अतिवृष्टीतील प्रभावित कृषी क्षेत्राचाही पंचनामा लवकरच केला जाईल. कृषी व महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष नुकसानग्रस्त भागाला भेट देवून पहाणी करुन पंचनामा करणार असल्याचेही तहसिलदार गायत्री सैंदाणे यांनी सांगितले. नुकसानग्रस्तांना शंभर टक्के भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. पाटील यांनी शेतकर्‍यांशी चर्चा करतांना सांगितले. बैठकीत जि.प.सदस्य आनंद पाटील, दह्याणे येथील पितांबर पाटील, चिंचवार माजी सरपंच सोमनाथ पाटील, बल्हाणे सरपंच आनंदा पाटील, शाम पाटील, प्रल्हाद मराठे, गोंदूर उपसरपंच हिरामण पाटील, शिरधाणे प्र.नेर येथील माजी सरपंच जिभाऊ पाटील, बापू पाटील, माजी उपसभापती दिनेश भदाणे, ग्रा.पं.सदस्य कन्हैया पाटील, धर्मराज बागुल उडाणे, युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष गणेश गर्दे, पाडळदे सरपंच शरद राठोड आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते.

हेही वाचा:

Back to top button