बारामती येथे पावसाची उघडीप; शेतीकामांना वेग

बारामती; पुढारी वृत्तसेवा: बारामती तालुक्यात पावसाने उघडीप दिल्याने शेतकर्यांची शेतातील कामे उरकण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. उसातील तण काढणे, औषध फवारणी आदी कामे सुरू आहेत. पावसामुळे उसासह बाजरी, सोयाबीन आदी पिके बहरली आहेत. बाजरी फुलोर्यात आली असून, चांगले उत्पन्न निघेल, अशी आशा शेतकर्यांना आहे. बारामतीच्या बागायती पट्ट्यात तरकारी पिकेही घेतली जात असून, शेतकरी त्यांचीही काळजी घेत आहेत.
गेल्या हंगामात सोयाबीनचे बियाणे खराब लागल्याने शेतकर्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र, चालू वर्षी कृषी विभागाने शेतकर्यांमध्ये जनजागृती करीत दर्जेदार बियाणे उपलब्ध करून दिले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली असली, तरीही दोन आठवड्यांवर येऊन ठेपलेल्या गौरी गणपती सणात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. तालुक्याला वरदान ठरलेले वीर धरण संपूर्ण भरल्याने शेतीच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. याशिवाय नाझरे धरण भरल्यामुळे जिरायती भागाला दिलासा मिळाला आहे.
वीर धरणातून निरा नदीत गेल्या आठ दिवसांपासून पाणी सुरू आहे, तर कर्हा नदी अजून पाण्याच्या प्रतीक्षेत आहे. समाधानकारक पावसामुळे जनावरांच्या चार्याचा प्रश्न मार्गी लागला असून, मेंढपाळ बांधवांनी समाधान व्यक्त केले आहे. ओढे, नाले, तलाव, विहिरीतील पाणीपातळीत वाढ झाली असून, शेतकरी समाधानी झाला आहे. सध्या विश्रांती घेतलेल्या पावसाने तालुक्यात नुकसान झाले नाही. मात्र, परतीच्या पावसाची टांगती तलवार शेतकर्यांना सतावत आहे. तालुक्यात या अगोदर परतीच्या पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले.