नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत | पुढारी

नाशिक : सातपूर-अंबड लिंक रोडवरील आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत

नाशिक (सातपूर): पुढारी वृत्तसेवा

नाशिकमधील सातपूर-अंबड लिंक रोडवरील प्लास्टिक भंगारच्या गोदामाला भीषण आग लागली आहे. अग्निशमन दलाकडून आग विझवण्याचे प्रयत्न सुरु असून या ठिकाणी बघ्यांची मोठी गर्दी झाली आहे.

सातपूर- अंबडलिंक रोडवरील आझादनगरमध्ये ज्वलनशील पदार्थ साठवलेल्या गोडावूनला रविवार (दि. २१) सकाळी ९ च्या दरम्यान भीषण आग लागली. यात सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसून पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार शब्बू मकबूल अहमद खान (रा.संजीवनगर) यांनी आझादनगर भागात भाड्याने गोडावून घेतले होते. मात्र, या ठिकाणी ज्वलनशील साहित्य साठवून ठेवण्यात आले. त्यामध्ये फोम व इतर साहित्य असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाला तब्बल दोन तासांची अवधी लागला. भंगार गोदाम या ठिकाणी आगीच्या घटना पूर्वी देखील घडल्या आहेत. सातपूर, अंबड, एमआयडीसी मुख्यालय येथील ५ बंबानी आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. यावेळी केंद्रप्रमुख प्रदीप परदेशी संजय तुपलोंढे, विजय मुसळे, संजय घाटगे, संधी शेख आदी अग्निशमन दलाचे कर्मचारी उपस्थित होते. सातपूर-अंबड लिंक रोडवर कच-यामुळे आणि गोदामाला वारंवार लागणा-या आगीमुळे भंगार गोदाम पुन्हा चर्चेत आले आहे. त्या निमित्ताने येथील भंगार गाेदामाच्या समस्यांचे निरसन करावे या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याचे पुन्हा एकदा निर्दशनास आले आहे. दरम्यान एकाच महिन्यात तीन वेळेस आग लागल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी आणि पोलीस प्रशासनाने या भंगार गोडाऊनच्या मालकाला जागेच्या मूळ मालकाबद्दल विचारणा केली असता त्यांच्याकडून कुठलेही उत्तर मिळाले नसल्याने भंगार मार्केटच्या अतिक्रमणचा विषय पुन्हा तापण्याची चिन्हे दिसत असून गोदामामुळे सारख्या घडणा-या आगींच्या घटनांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत.

हेही वाचा:

Back to top button