सोलापूर : चोराने विहिरीत उडी मारून जीव गमावला | पुढारी

सोलापूर : चोराने विहिरीत उडी मारून जीव गमावला

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा : चोरी करताना गुरुवारी मध्यरात्री ग्रामस्थांनी पाटलाग केल्यामुळे पळून जाताना चोराने विहिरीत उडी मारली होती. 18 तासांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर विहिरीतील चोरट्याचा मृतदेह बाहेर काढण्यास पोलिस प्रशासन व ग्रामस्थाना यश आले.

अक्कलकोट तालुक्यातील सुलेरजवळगे येथे गुरुवारी मध्यरात्री चोरट्यांनी गावात धुमाकूळ घातला. गावातील राहुल बगले आणि दादाराव चव्हाण यांच्या घराचे दरवाजे तोडून आत प्रवेश केला आणि घरातील रोख रकमेसह दागिने घेऊन चोर बाहेर जात होते. याची कुणकुण गावातील युवक कार्यकर्त्यांना लागली. त्यामुळे या युवकांनी तत्काळ चोराचा पाठलाग सुरू केला. चोर हा युवक कार्यकर्त्यांच्या तावडीतून सुटण्यासाठी दिसेल त्या मार्गाने तो पळू लागला. या पळापळीत चोरट्याने रस्ता समजून गावातील पाटील यांच्या विहिरीतच उडी मारली. याप्रकरणी युवकांनी पोलिसांशी संपर्क साधला. तोपर्यंत चोरट्याचा त्या विहिरीतच जीव गेला.

ही घटना कळताच अक्कलकोट दक्षिण पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक प्रदीप काळे, पोलिस निरीक्षक बाळासाहेब काकडे, उपनिरीक्षक प्रवीण लोकरे, पोलिस नाईक मल्लिकार्जुन गोटे, पांढरे आदी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, गावातील युवक कार्यकर्ते व ग्रामस्थांकडून माहिती घेतल्यानंतर मदत कार्याला सुरुवात झाली.

विहिरीतील मृतदेह काढण्यासाठी जीवरक्षकांना बोलवण्यात आले. दोन मोटारीच्या सहाय्याने विहिरीतील पाणी उपसण्यात आले, त्यानंतर जीवरक्षक घटनास्थळी आले. जीवरक्षक मल्लिकार्जुन धुळखेडे, श्रीकांत बनसोडे, प्रवीण जेऊरे, तेजस म्हेत्रे, महेश रेवणे व इतर सहकारी ग्रामस्थ, पोलिस प्रशासनाच्या मदतीने अखेर 18 तासांच्या प्रदीर्घ प्रयत्नानंतर चोरट्याचा मृतदेह बाहेर काढण्यात यश आले.

Back to top button