सोलापूर : आठ किलोमीटर अंतरातील फाटक बंद करा | पुढारी

सोलापूर : आठ किलोमीटर अंतरातील फाटक बंद करा

सोलापूर : पुढारी वृत्तसेवा :  दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी रेल्वे स्टेशन ते होटगी रेल्वे स्टेशन दरम्यान आठ किलोमीटर अंतरामध्ये रेल्वेचे तब्बल चार फाटक आहेत. सतत रेल्वेच्या दळणवळणामुळे फाटक 10 ते 30 मिनिटे कालावधीकरिता बंद करून वाहतूक रोखून धरले जाते. त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना निश्चित वेळेत पोहोचणे होत नसल्याने खूप मोठा त्रास दररोज सहन करावा लागत आहे.

सोलापूर-गुलबर्गा रेल्वे महामार्गावर तिलाटी रेल्वे स्टेशन जवळ पहिला मध्य रेल्वेचा 61 क्रमांक रेल्वे फाटक आहे. दुसरा चेट्टीनाड सिमेंट कंपनीचा रेल्वे फाटक व तिसरा झुयारी सिमेंट कंपनीचा रेल्वे फाटक आहे. तर चौथा हा होटगी स्टेशनजवळ अल्ट्राटेक सिमेंट कंपनीचा रेल्वे फाटक आहे.

इंगळगी, शिरवळ, कणबस, जेऊर, करजगी, पानमंगरूळ, आलेगाव, आचेगाव, औज, अक्कलकोट स्टेशन, तडवळ, शावळ, हैद्रा, मणूर या गावासह सीमावर्ती भागातील विद्यार्थी, नागरिक, नोकरदार, रुग्ण सोलापूरला येण्या-जाण्यासाठी तिलाटी रेल्वे स्टेशन ते होटगी रेल्वे स्टेशन मार्गावरूनच प्रवास करतात. मात्र 61 क्रमांक रेल्वे फाटक आणि अन्य तीन सिमेंट फॅक्टरीचे रेल्वे फाटक सतत बंद होत असल्यामुळे येथे रस्ता बंद करून वाहतूक रोखून धरले जाते. नागरिकांना विनाकारण त्रास दिला जातो. विद्यार्थी, नोकरदार आणि रुग्णांना याचा दररोज खूप मोठा फटका बसत आहे. यासाठी इंगळगी ग्रामपंचायतीकडून राहुल वंजारे व सागर धुळवे यांनी आमदार सुभाष देशमुख यांना शनिवारी निवेदन दिले.

भुयारी मार्ग उपलब्ध करून द्या

विद्यार्थी, नोकरदार तसेच रुग्णांना लवकरात लवकर तातडीने सेवा मिळण्यासाठी व वाहतूकदारांचा त्रास कमी करण्यासाठी हे चारही रेल्वे फाटक तातडीने बंद करून येथे भुयारी मार्ग व इतर व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली आहे. आमदार देशमुख यांनी यात लक्ष घालून पर्यायी व्यवस्थेसाठी डीआरएम यांना भेटणार असल्याचे सांगितले.

Back to top button