जळगाव : जैन उद्योग समूहाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान | पुढारी

जळगाव : जैन उद्योग समूहाकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या कार्याचा सन्मान

जळगाव : पुढारी वृत्तसेवा
देशाच्या स्वातंत्र्य संग्रामात जिल्ह्यातील स्वातंत्र्यसैनिकांचे व त्यांना मदत करणार्‍या असंख्य जिल्हावासीयांचे योगदान अधोरेखित करण्यासारखे आणि प्रेरणादायी आहे. स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त स्वातंत्र्यसैनिकांच्या याच कार्याचे स्मरण करत जैन उद्योग समूहाने कंपनी आस्थापनांमधील ध्वजारोहण स्वातंत्र्यसैनिकांच्या पत्नी यांच्यासह ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्याचे योजले आहे.

यामध्ये 1942 च्या स्वातंत्र्य चळवळीसह, देवकीनंदन नारायण यांच्या मार्गदर्शनाखाली स्वातंत्र्य संग्रामातील भूमिगत चळवळीत सहभागी होऊन धुळे येथे कारागृहात बंदिवान राहिलेले भगवान कंडारे यांच्या पत्नी लक्ष्मीबाई कंडारे यांच्या हस्ते अनुभूती इंग्लिश स्कूल प्रायमरी येथे ध्वजारोहण करण्यात येईल. पोर्तुगीजांविरुद्ध लढा देत गोवामुक्तीसाठी संघर्ष करणार्‍या स्व. पंढरीनाथ मराठे यांच्या पत्नी रंभाबाई मराठे यांच्या हस्ते अनुभूती इंग्लिश स्कूल सेकंडरी येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्यसैनिक अजितसिंग राजपूत यांच्या पत्नी सुलोचना राजपूत यांच्या हस्ते महात्मा गांधी उद्यान येथे ध्वजारोहण होईल. स्वातंत्र्यसैनिक लालसिंग पवार यांच्या पत्नी दगूबाई पवार यांच्या हस्ते भाऊंचे उद्यान येथे ध्वजारोहण होईल. यासोबतच ज्यांनी पारतंत्र्य अनुभवले आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांमध्ये जैन अ‍ॅग्रीपार्क येथे सेवादास दलिचंदजी ओसवाल, लीलाबाई दलिचंदजी ओसवाल यांच्या हस्ते ध्वजारोहण होईल. जैन फूड पार्क व एनर्जी पार्क येथे ताराबाई शिवराज जैन यांच्या हस्ते, वाकोद येथे कविवर्य ना. धों. महानोर यांच्या हस्ते, प्लास्टिक पार्क येथे शकुंतलाबाई कांतीलाल जैन यांच्या हस्ते, टिश्यूकल्चर पार्क येथे सुलभा जोशी यांच्या हस्ते, कांताई नेत्रालय येथे डॉ. सुभाष चौधरी यांच्या हस्ते, कांताई बंधारा येथे माणकचंदजी सांड यांच्या हस्ते, कांताई सभागृह येथे प्रा. गणपतराव पोळ यांच्या हस्ते, तर अनुभूती निवासी स्कूल येथे प्राचार्य देबासिस दास यांच्या हस्ते ध्वजारोहण होणार आहे.

हेही वाचा:

Back to top button