नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे ‘राज ठाकरे’ यांचे आदेश | पुढारी

नाशिक महापालिका निवडणुकीसाठी 700 राजदूत नेमण्याचे 'राज ठाकरे' यांचे आदेश

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरातील आपला पाया भक्कम करण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरात 700 राजदूतांची नेमणूक करणार आहे. मतदार यादीनिहाय संबंधित राजदूत मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीगाठी घेत त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. त्याचबरोबर पुढील महिन्यात मनसे प्रमुख राज ठाकरे हे नाशिक दौर्‍यावर येणार आहेत.

नाशिक येथील मनसेचे पदाधिकारी शुक्रवारी (दि.12) राज ठाकरे यांच्या भेटीसाठी मुंबईला गेले होते. त्यावेळी ठाकरे यांनी पदाधिकार्‍यांशी संवाद साधत निवडणुकीबाबत निर्णय काहीही होऊ द्या, तुम्ही जोरात कामाला लागा, असा कानमंत्र दिला. राज ठाकरे यांनी महापालिका निवडणुकीसाठी नाशिक आणि पुणे या दोन शहरांवर विशेष लक्ष पुरविले आहे. गेल्या आठवड्यात महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी नाशिकचा दौरा केला होता. यात त्यांनी नाशिक ग्रामीण आणि शहरातील विविध महाविद्यालयांत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला होता. या दौर्‍याचा अहवाल राज ठाकरे यांना सादर करण्यात आला. शहराध्यक्ष दिलीप दातीर, जिल्हाध्यक्ष अंकुश पवार, अ‍ॅड. रतन कुमार, शहर समन्वयक सचिन भोसले तसेच सलीम शेख, प्रवक्ते पराग शिंत्रे यांना राज ठाकरे यांनी मुंबईत बोलावले होते. या भेटीत ठाकरे यांनी नाशिकमधील आढावा घेतला. तसेच मतदारांपर्यंत पोहोचवा, अशी सूचना दिल्या. सक्रिय नसलेल्या पदाधिकार्‍यांच्या जागी अन्य पदाधिकार्‍यांची नियुक्ती करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत.

शाखाध्यक्षांच्या कार्याचा घेणार आढावा
महापालिका निवडणुकीच्या दृष्टीने हजार मतदारांमागे एक यादी यानुसार जवळपास 700 मतदारयाद्या सद्यस्थितीत असून, प्रत्येक यादीमागे एक राजदूत नियुक्त करण्याचे मनसेचे नियोजन आहे. त्यानुसार संबंधित राजदूत त्या-त्या भागातील मतदारांपर्यंत पोहोचून संवाद साधतील. मनसेने प्रभागनिहाय शाखा अध्यक्ष तसेच सहाही विभागांमध्ये अध्यक्षांची नियुक्ती केली आहे. या शाखा अध्यक्ष तसेच विभाग अध्यक्षांच्या कार्याचा आढावा घेण्यास राज ठाकरे यांनी सांगितले.

हेही वाचा :

Back to top button