सांगलीला पुराचा धोका; एनडीआरएफ दाखल, पातळी आज ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता | पुढारी

सांगलीला पुराचा धोका; एनडीआरएफ दाखल, पातळी आज ३५ फुटांपर्यंत जाण्याची शक्यता

सांगली; पुढारी वृत्तसेवा : मुसळधार पाऊस व कोयना, चांदोली धरणातून पाणी सोडल्याने कृष्णा, वारणा नद्यांना पूर आला आहे. सांगली शहरासह वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील नदीकाठच्या गावांना पुराचा धोका निर्माण झाला आहे. वारणा नदीचे पाणी नदीकाठच्या गावांत शिरू लागले आहे.

धरण परिसरात तुफानी पाऊस सुरू आहे. मागील 24 तासांत कोयना येथे 231 मिमी पाऊस पडला. याप्रमाणेच नवजा येथे 155 व महाबळेश्वरला 251 मिमी उच्चांकी पाऊस पडला. प्रचंड पाऊस व पाण्याच्या आवकेमुळे कोयनेतून प्रतिसेंकद 10 हजार 100 क्यूसेक पाण्याचा विसर्ग नदीपात्रात होत आहे. परिणामी कृष्णा नदीची पाणीपातळी गतीने वाढू लागली आहे. वाळवा तालुक्यातील बहे पुलाजवळ पाणीपातळी 11 फूट झाली आहे. पलूस तालुक्यातील ताकारीत पाणी 32 फुटांपर्यंत पोहोचले आहे. भिलवडी पुलाजवळ पाणी 32 फूट झाले आहे. आमणापूर पूल, नागठाणे बंधारा, औदुंबरचे दत्तमंदिर पाण्याखाली गेले आहे. वाळवा, पलूस, मिरज तालुक्यातील अनेक गावांना पुराचा वेढा पडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सांगलीत आयर्विन पुलाजवळ 30 फूट पाणी झाले आहे.

जिल्हा प्रशासन तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांनी नदीकाठच्या लोकांना स्थलांतराच्या सूचना दिल्या. सांगली शहर व वाळवा तालुक्यात धोकादायक ठिकाणी एनडीआरएफची पथके तैनात केली. पाणी शिवारातून गावात शिरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुराच्या धास्तीने अनेकांनी साहित्याची बांधाबांध सुरू केली आहे.

धरणांतील पाणीसाठा व अलमट्टीतील विसर्ग

चांदोली धरणात 31.34 टीएमसी (34) पाणीसाठा झाला आहे. कोयना धरणात 89 (105.25 क्षमता) टीएमसी साठा झाला आहे. धोममध्ये 11.74 (13.50), कण्हेरमध्ये 8.85 (10.10) साठा आहे. अलमट्टी धरण 107.721 (123) टीएमसी भरले आहे. या धरणात सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातून एक लाख 55 हजार 47 क्यूसेक पाणी जात आहे, तर पुढे दोन लाख 25 हजार क्यूसेक पाणी सोडले जात आहे.

जिल्ह्यात पावसाची उघडझाप

जिल्ह्यात गेल्या 24 तासांत सरासरी 7.5 मिमी पावसाची नोंद झाली. शिराळा तालुक्यात सर्वाधिक 27.4 मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात गेल्या 24 तासांत पडलेला पाऊस व कंसात 1 जूनपासून आतापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मिमीमध्ये पुढीलप्रमाणे : मिरज- 4.5 (295.9), जत – 0.5 (267.2), खानापूर-विटा- 6.0 (350.5), वाळवा -इस्लामपूर- 11.6 (436.6), तासगाव- 5.7 (293.6), शिराळा – 27.4 (885.2), आटपाडी- 0.5 (215.4), कवठेमहांकाळ – 2.6 (382.2), पलूस – 7 (259.2), कडेगाव – 7.1 (347.5).

Back to top button