नाशिक : दोन मुदतवाढीनंतरही पेस्ट कंट्रोलला मिळेना ठेकेदार | पुढारी

नाशिक : दोन मुदतवाढीनंतरही पेस्ट कंट्रोलला मिळेना ठेकेदार

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
निविदा प्रक्रियेला दोन वेळा मुदतवाढ देऊनही औषध फवारणी अर्थात पेस्ट कंट्रोलच्या ठेक्याला ठेकेदारांकडून प्रतिसादच मिळत नसल्याने मलेरिया विभागाकडून तिसर्‍यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे. दोन्ही वेळा केवळ एकाच ठेकेदाराकडून निविदा भरण्यात आली आहे. एकीकडे निविदेचा फेरा सुरू असताना दुसरीकडे शहरात डेंग्यू, चिकुनगुनिया आणि स्वाइन फ्लूचा प्रादुर्भाव होत असल्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली आहे.

या आधी महापालिकेने राबविलेल्या निविदा प्रक्रियेला सध्याच्या ठेकेदाराने स्थगिती मिळविली होती. त्यामुळे महापालिका प्रशासनाला टीकेचे धनी व्हावे लागले होते. जुन्या ठेकेदाराला मुदतवाढ मिळावी म्हणून प्रशासनातील अधिकार्‍यांकडून स्थगिती उठविण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचा आरोप स्थायी समिती सभेकडून करण्यात आला होता. त्यानंतर महत्प्रयास करून न्यायालयाने दिलेली स्थगिती उठविण्यात मलेरिया विभागाला यश मिळाले. त्यानुसार सध्या निविदा प्रक्रिया राबविली जात असून, दोन वेळा प्रतिसाद न मिळाल्याने तिसरी मुदतवाढ देण्यात आली आहे. येत्या 17 ऑगस्टपर्यंत त्यासाठी मुदत आहे. त्यानंतरही दोनहून अधिक निविदा दाखल न झाल्यास आयुक्तांच्या परवानगीने फेरनिविदा काढण्यात येऊन प्रक्रिया राबविली जाणार आहे.

दरम्यान, पावसाळ्यामुळे डेंग्यू, चिकुनुगुनिया, मलेरियासारख्या संसर्गजन्य आजारांचा प्रादुर्भाव वाढत आहे. जानेवारी ते जुलै 2022 या कालावधीत डेंग्यूचे 73 रुग्ण आढळले होते. ऑगस्टच्या गेल्या आठ दिवसांतच 19 नवे डेंग्यूबाधित आढळले असून, हा आकडा महापालिकेच्या रुग्णालयात उपचार घेणार्‍या रुग्णांचा आहे. खासगी रुग्णालयांमध्ये यापेक्षा अधिक संख्या असू शकते. संसर्गजन्य आजारांचे प्रमाण वाढत असल्याने शहर परिसरात मोठ्या प्रमाणावर औषध फवारणी होऊन डासांची उत्पत्तीस्थाने नष्ट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे. ठेकेदाराकडून पूर्ण क्षमतेने औषध फवारणी तथा पेस्ट कंट्रोल केले जात नसल्याने डासांच्या प्रादुर्भावात मोठी वाढ झाल्याचे दिसून येत आहे.

पावणेदोन लाख पाणीसाठ्यांची तपासणी
संसर्गजन्य आजारांच्या पार्श्वभूमीवर मलेरिया विभागामार्फत शहरात घराघरांचे सर्वेक्षण केले जाते. यात आतापर्यंत 1 लाख 46 हजार 468 घरे तपासण्यात आल्याचा दावा मलेरिया विभागाने केला आहे. सर्वेक्षणात 1 लाख 85 हजार 709 पाणीसाठ्यांची तपासणी केली. त्यात 235 घरांमधील 500 पाणीसाठ्यांमध्ये डेंग्यू डासांची उत्पत्ती होत असल्याचे आढळले. 331 पाणीसाठे रिकामे करण्यात आले. 167 पाणीसाठ्यांमधील डास अळी नष्ट करण्यात आले आहेत. डासांच्या प्रादुर्भावास कारणीभूत ठरणार्‍या 58 जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button