नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा | पुढारी

नाशिक : ऐतिहासिक वारसास्थळांवर फडकणार तिरंगा

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
‘हर घर तिरंगा’अंतर्गत जिल्ह्यात मंगळवारपासून (दि.9) विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील 12 लाख घरांसह ऐतिहासिक वास्तूस्थळांवर तिरंगा राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी गंगाथरन डी. यांनी दिली आहे. तसेच प्रभातफेरी, निबंध स्पर्धा, वृक्षशरोपणही केले जाणार असल्याचे सांगताना स्वातंत्र्य दिन राष्ट्रीय सण म्हणून साजरा करण्याचे आवाहन त्यांनी जिल्हावासीयांना केले.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यात 9 ते 15 ऑगस्ट या कालावधीत विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (दि.8) पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्याप्रसंगी गंगाथरन डी. यांनी मार्गदर्शन केले. जिल्ह्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या सरकारवाडा, चांदवडचा रंगमहाल, भगूर येथील वीर सावरकर स्मारक, नीळकंठेश्वर मंदिर सर्व ठिकाणांसह अमृतसरोवर अंतर्गत सात ठिकाणी राष्ट्रध्वज फडकविण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. जिल्ह्यातील प्रत्येक घरावर तिरंगा झेंडा फडकविण्यात येणार आहे. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी भागवत डोईफोडे व उपजिल्हाधिकारी नितीन मुंडावरे आदी उपस्थित होते.

75 फूट उंच ध्वजस्तंभ
जिल्हाधिकारी कार्यालय तसेच जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी 75 फूट उंचीचा राष्ट्रध्वज आणि संविधान स्तंभ उभारण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून दोन कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती जिल्हाधिकार्‍यांनी दिली. प्रत्येक तहसील कार्यालयाला पाच लाखांचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. या निधीतील पाच टक्के रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयाने आयोजित उपक्रमासाठी राखीव ठेवण्यात येईल.

असे असतील कार्यक्रम
तालुक्यातील सर्व शाळांमध्ये 10 ऑगस्टला सकाळी 10 वाजता एकाचवेळी प्रभातफेरी काढण्यात येईल. 12 तारखेला सकाळी 10 ते 1 यावेळेत शाळांमध्ये वकृत्व व निबंध स्पर्धांचे आयोजन करावे. त्यानंतर दुपारी 2 ते 4 या वेळेत स्वातंत्र्य लढ्यात सहभाग घेतलेल्या सैनिकांचे योगदान, स्वातंत्र्य संग्रामातील महत्त्वपूर्ण घटना, थोर क्रांतिवीर या विषयांवर व्याख्यान व यानंतर सायं. 4 वाजता बक्षीस वितरण समारंभाचे आयोजन करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी केल्या आहेत.

हेही वाचा :

Back to top button