जागतिक आदिवासी दिन विशेष: राज्यातील तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल’ | पुढारी

जागतिक आदिवासी दिन विशेष: राज्यातील तीस शासकीय आश्रमशाळांचे होणार ‘मॉडेल स्कूल’

नाशिक : नितीन रणशूर
राज्यातील दुर्गम-अतिदुर्गम भागात राहणार्‍या अनुसूचित जमातीमधील विद्यार्थ्यांना शासकीय आश्रमशाळेतच दर्जेदार शिक्षण मिळावे, या हेतूने मूलभूत सुविधा उपलब्ध असलेल्या राज्यातील 100 शासकीय आश्रमशाळांनाच ‘मॉडेल स्कूल’ म्हणून तयार करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यात 30 मॉडेल स्कूल करण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून मंजुरी मिळाली आहे. नाशिकमध्ये 9 मॉडेल स्कूल उभारण्याची प्रक्रिया बांधकाम विभागाकडून राबविली जात आहे.

राज्यात आदिवासी विकास विभागाच्या 502 शासकीय आश्रमशाळा असून, यात सुमारे दोन लाख विद्यार्थी शिक्षण घेतात. शासकीय आश्रमशाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी आदिवासी विकास विभागातर्फे उपाययोजना करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून राज्यातील 100 शासकीय आश्रमशाळा या ‘मॉडेल स्कूल’ करण्यात येणार आहेत. त्यासाठी आदिवासी उपाययोजनेंतर्गत निधीदेखील मंजूर झाला असून, शाळांमध्ये भौतिक व शैक्षणिक सर्व प्रकारच्या सुविधा विद्यार्थ्यांना पुरविल्या जाणार आहेत. शासकीय आश्रमशाळा मॉडेल स्कूलमध्ये रूपांतर करत असताना याठिकाणी विद्यार्थ्यांसाठी डिजिटल क्लासरूम, अद्ययावत संगणक कक्ष, सुसज्ज ग्रंथालय, कला व क्रीडा विभाग, अद्ययावत भोजनालय, सभागृह आदींचा समावेश असणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात प्रत्येक प्रकल्प कार्यालयातील एक शाळा निवडण्यात आली आहे. मॉडेल स्कूल करण्याच्या दृष्टीने आदिवासी विकास विभागांतर्गत असलेल्या बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात आली असून, लवकरच शासकीय आश्रमशाळा कात टाकणार आहे.

आदिवासी समाजातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार शिक्षण देण्यासाठी राज्य शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. त्याअंतर्गतच शासकीय आश्रमशाळांना ‘मॉडेल स्कूल’ बनविण्याचा निर्णय शासनाने घेतला. पहिल्या टप्प्यात नाशिकमध्ये 9 मॉडेल स्कूल तयार करण्यात येणार आहे. त्याबाबतची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
– विजय पाटील, अधीक्षक अभियंता, आदिवासी विभाग, नाशिक

प्रकल्पनिहाय निवड झालेल्या शाळा

भीलमाळ- नाशिक, मेवशी- राजूर, कनाशी- कळवण, कोठाळी- नंदुरबार, तोरणमाळ- तळोदा, लालमाती- यावल, रोहाडा- धुळे, खडकी- नंदुरबार, तळंबा- तळोदा, रंकोल- डहाणू, गोंदे- जव्हार, शिरोल- शहापूर, भालेवाडी-पेण, राजपूर- घोडेगाव, होटगी- सोलापूर, बेलदा- नागपूर, खापा- भंडारा, हिरापूर (तळन)- वर्धा, बोरगाव बाजार- गोंदिया, गडचिरोली ईएमएस- गडचिरोली, कासननूर- गडचिरोली, झिंगानूर- गडचिरोली, चंदनखेडा- चंद्रपूर, मारेगाव- चंद्रपूर, कोरता- यवतमाळ, कोठाळी- अकोला, गोटेवाडी- नांदेड, दुधाड- हिंगोली, टेंबाली- अमरावती, बोटोनी- यवतमाळ.

हेही वाचा :

Back to top button