अबब..अडीच एकर कोथिंबिरीने दिले साडेसहा लाख! मंडलिक यांचे प्रयत्न सव्वा महिन्यात यशस्वी | पुढारी

अबब..अडीच एकर कोथिंबिरीने दिले साडेसहा लाख! मंडलिक यांचे प्रयत्न सव्वा महिन्यात यशस्वी

संगमनेर शहर; पुढारी वृत्तसेवा: संगमनेर तालुक्यातील निमोण येथील शेतकरी रंगनाथ महादू मंडलिक यांनी अडीच एकरांवर लावलेली कोथिंबीर केवळ सव्वा महिन्यातच एका व्यापार्‍याने तब्बल साडेसहा लाख रुपयांना खरेदी केल्याने हा विषय चर्चेचा ठरला आहे. दरम्यान, गेल्या पाच वर्षातील कोथिंबिरीचा हा उच्चांकी दर असल्याचे व्यापारी नारायण केकाण व शेतकरी रंगनाथ मंडलिक सांगतात. निमोण गावासह परिसरात कोथिंबिरीची शेती मोठ्या प्रमाणावर केली जाते. लॉकडाऊन शिथिल झाल्याने शेतमालाचे दर चांगलेच भडकल्याचे चित्र निर्माण झाले आहे. बाजारामध्ये कोथिंबिरीच्या एका जुडीला 40 ते 45 रुपये लागत आहेत. त्यांना कोथिंबिरीचे उत्पादन घेण्यासाठी 20 ते 25 हजार रुपये खर्च आला, तर त्यांना एकरी नफा हा सरासरी 2 लाख रुपये मिळाला आहे.

उन्हाळ्यात अनेक शेतकर्‍यांना कोथिंबिरीची लागवड करताना अनेक अडचणी येतात. मंडलिक यांनी कोथिंबीर लागवड करताना संभाव्य धोका ओळखत जून महिन्यात निमोण येथील साई कृषी सेवा केंद्रामधून ‘रामसेत जातीचे’ कोथिंबिरीचे बी विकत घेवून लागवड केली. पावसाच्या पाण्यावर कोथिंबिरीचे नियोजन केले. जून महिन्यात सतत पडणार्‍या पावसाच्या पाण्यावर कोथिंबिरीचे पीक जोमात आल्याचे मंडलिक यांचे म्हणणे आहे. निमोणसह परिसरात दुष्काळ असतो. गावांना पावसाचा आधार असतो.

मात्र, झालेल्या पावसाने पाण्याची बचती करून पिकांचे नियोजन केले जाते. बहुताश शेतकरी कोथिंबिरीची लागवड करतात. कमी प्रमाणात पाणी असल्यामुळे पाण्याच्या नियोजनाने कोथिंबीर पीक जोमात आणतात. लॉकडाऊन काळात शेतकर्‍यांना उत्पादन खर्च देखील निघाला नाही. मात्र, गेल्या पंधरा दिवसांपासून कोथिंबिरीला समाधानकारक दर मिळत आहे. किरकोळ बाजारात कोथिंबिरीच्या 1 जुडीला तब्बल 40 ते 45 रुपये दर मिळत आहे. काही व्यापारी थेट शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन कोथिंबीर खरेदी करीत आहेत. ही बाब सर्वांसाठी चक्रावणारी आहे. गेल्या सहा महिन्यांपासून कोथिंबिरीला समाधानकारक दर नव्हते.

हमी भाव मिळाल्यास आत्महत्या थांबतील..!
शेतकरी जीव ओतून शेतात काबड कष्ट करुन मोठ्या प्रमाणात विविध प्रकारे पिक घेतो, मात्र त्याच्या कष्टाचे पाहिजे, तसे त्याला फळ मिळत नाही. शेतमाला चांगला भाव मिळत नसल्याने शेतकरी वर्गाला सातत्याने संकटाला सामोरे जावे लागते. किमान हमीभाव मिळाल्यास आत्महत्या तरी थांबतील, अशी भावना रंगनाथ मंडलिक यांनी व्यक्त केली.

Back to top button