ट्रॅव्हल्स मधून गांजाची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या | पुढारी

ट्रॅव्हल्स मधून गांजाची तस्करी करणाऱ्या युवकाला बेड्या

धुळे; पुढारी वृत्तसेवा : इंदोरकडून गोव्याकडे जाणाऱ्या आराम बस मधून होणारी गांजाची तस्करी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांच्या पथकाने हाणून पाडली आहे. या प्रकरणात अहमदनगर जिल्ह्यातील तरुणाला गांजासह अटक करण्यात आली आहे.

इंदोरकडून गोवाकडे जाणाऱ्या (वाहन क्र. एमपी 09 एफए 9153) आराम बसमधून गांजाची तस्करी होणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानुसार त्यांनी मुंबई आग्रा महामार्गावर धुळे तालुक्यातील नगाव गावाजवळ हॉटेल अमोल नजीक सापळा लावला. यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळासाहेब सूर्यवंशी, नायब तहसीलदार पावरा यांच्यासह पोलीस कर्मचारी श्रीकांत पाटील, प्रभाकर बैसाने, प्रकाश सोनार, संदीप सरग, योगेश चव्हाण, कमलेश सूर्यवंशी, राहुल गिरी आदींनी सापळा लावला.

यावेळी या पथकाने संशयित आरामबस थांबवून तपासणी करण्यास सुरुवात केली. यावेळी अहमदनगर येथील वाबळे कॉलनीत राहणारा नीरज ललित कथुरिया या युवकाच्या ताब्यात सुमारे चार किलो वजनाचा सुका गांजा आढळून आला. त्यामुळे पथकाने त्याला ताब्यात घेतले असून त्याने हा गांजा नेमका कुणाकडून घेतला आणि कुणासाठी तस्करी होत होती. याविषयीची चौकशी सुरू केली आहे. दरम्यान या संदर्भात पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Back to top button