नाशिक : होळकर पुलाच्या जाळ्यांची पुन्हा चोरी : मनपाच्या बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा | पुढारी

नाशिक : होळकर पुलाच्या जाळ्यांची पुन्हा चोरी : मनपाच्या बांधकाम विभागाचा हलगर्जीपणा

पंचवटी : पुढारी वृत्तसेवा
पंचवटी आणि नाशिक शहराला जोडणार्‍या ऐतिहासिक अहिल्यादेवी होळकर (व्हिक्टोरिया) पुलाच्या लोखंडी संरक्षक जाळ्यांची पुन्हा एकदा चोरी झाली असून, नागरिकांची सुरक्षा धोक्यात आली आहे. मनपाच्या पंचवटी विभागीय अधिकार्‍यांनी बजावूनही बांधकाम विभागाने केलेल्या हलगर्जीपणामुळे वारंवार जाळ्या चोरीच्या घटना घडत असल्याचे दिसून येत आहे. यामुळे अहिल्यादेवी होळकर पुलाचा वनवास कधी संपणार, असा प्रश्न पुलावरून जाणार्‍या – येणार्‍या नाशिककरांना पडला आहे.

ऐतिहासिक पूल म्हणून ओळखल्या जाणार्‍या या पुलाचे जतन आणि सुरक्षा अत्यंत चोखपणे करणे महापालिका प्रशासनाचे कर्तव्य आहे. मात्र, असे असतानाही या पुलाच्या जाळ्या मात्र नेहमी गायब होत असतात. भुरटे चोर कठड्यांच्या पाइपांची नियमित चोरी करत असल्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. साधारण सप्टेंबर 2021 पासून आजपर्यंत तीन वेळा पुलावरील कठडे आणि लोखंडी जाळ्यांची चोरी झाल्याचे दिसून येते. असे असूनही महापालिका मात्र सुरक्षेच्या दृष्टिकोनातून काही उपाययोजना राबविताना दिसत नसल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

पंचवटीत सध्या पालिकेच्या मालकीचे साहित्य चोरी करणार्‍या भुरट्या चोरट्यांचा सुळसुळाट सुरू असल्याचे बघायला मिळत आहे. सप्टेंबर तसेच एप्रिल महिन्यातही होळकर पुलावरील तुटलेल्या कठड्यांचे पाइप चोरी झाल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर पंचवटी विभागीय अधिकारी यांनी तत्काळ तुटलेल्या कठड्यांना संरक्षक जाळ्या बसविण्याबाबत सूचना बांधकाम विभागाला केल्या होत्या. पुलाच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्या सूचनांचे पालन करताना ‘सरकारी काम आणि सहा महिने थांब’ या उक्तीप्रमाणे उशिराने हे काम पार पाडले. परंतु, या कामाच्या दर्जाबद्दल आणि कामाबद्दल न बोललेले बरे. यानंतर बांधकाम विभागाने तात्पुरता उपाय म्हणून भंगारमध्ये पडलेल्या लोखंडी जाळ्या साध्या बाइंडिंग तारीच्या साहाय्याने पुलावरील तुटलेल्या कठड्यांच्या ठिकाणी बांधल्या. पण, जेव्हा ही बाब पंचवटी विभागीय अधिकारी कैलास राभडिया यांच्या निदर्शनास आली. त्यानंतर लगेचच त्यांनी त्या कामाबाबत बांधकाम विभागाच्या अधिकार्‍यांना फोन करून त्या जाळ्यांना वेल्डिंग करण्याच्या सूचना केल्या होत्या. परंतु, अधिकार्‍यांचे ऐकतील ते कर्मचारी कसले. त्यामुळे त्या जाळ्या तशाच लटकलेल्या अवस्थेत राहिल्या. दोन महिन्यांपूर्वी बसवलेल्या या लोखंडी जाळ्या गेल्या आठवड्यात रात्रीतून पुन्हा एकदा चोरी झाल्या. आता जर त्या जाळ्या विभागीय अधिकारी यांच्या सांगण्यानंतर लगेच बांधकाम विभागाने वेल्डिंग केल्या असत्या तर जाळ्यांची चोरी झाली नसती. मात्र, याबाबत कोणालाच काहीही देणे-घेणे नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे.

नागरिकांनाच आवाज उठवावा लागणार
सरकारी मालमत्तेच्या अशा अनेक ठिकाणी वारंवार चोरी होत असते आणि त्याबाबत कोणताही व कधीही गुन्हा दाखल केला जात नाही. तसेच कोणत्याही पद्धतीने याचा तपास केला जात नाही. याबाबत नाशिक महापालिकेतील अधिकार्‍यांनी चिंतन करणे गरजेचे आहे. तसेच या ऐतिहासिक पुलावरील जाळ्यांबाबत काहीतरी कायमचा उपाय करणे गरजेचे आहे. अन्यथा पुलावरून नागरिकांना रोजच जीव मुठीत धरून मार्गक्रमण करावे लागणार आहे. सरकारी मालमत्तेची वारंवार चोरी होऊनही प्रशासनाला सोयरसुतक नसेल तर यावर नागरिकांनाच आवाज उठवावा लागणार आहे.

शाळकरी मुलांना धोका
रविवार कारंजा, शालिमार परिसरातील विविध शाळांंमधील पंचवटीतील मुले याच पुलावरून मार्गक्रमण करतात. अशावेळी सध्या पावसाळा सुरू असल्याने नदीतील पूरपाणी बघण्यासाठी पुलावरून डोकावत असतात. अशावेळी संरक्षक जाळ्या नसल्याने धोक्याची घटना घडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा:

Back to top button