औरंगाबाद : २०० ठराव करून किती पैसे नेले याची चौकशी करा : स्मिता घोगरे | पुढारी

औरंगाबाद : २०० ठराव करून किती पैसे नेले याची चौकशी करा : स्मिता घोगरे

औरंगाबाद; पुढारी वृत्तसेवा : प्रशासकांच्या काळात वार्डातील विकास कामांसाठी आम्हाला झगडावे लागले. नागरिकांच्या सुविधांची कामे असूनदेखील प्रत्येक वेळी पैसे नाहीत असे कारण पुढे करत कामे मंजूर केली नाहीत. आता प्रशासक जाताना दोनशे ठराव मंजूर केले आहेत. यामुळे आधी कामांसाठी पैसे नाहीत म्हणऱ्यांनी इतके ठराव करून त्यांनी किती पैसे नेले?, असे म्हणत प्रशासकांनी त्यांच्या शेवटच्या महिनाभरात केलेल्या सर्व दोनशे ठरावांची चौकशी करावी, अशी मागणी माजी उपमहापौर स्मिता घोगरे यांनी केली आहे.

त्वरित कारवाई व चौकशी झाली पाहिजे : प्रवीण जाधव

महिनाभरात दोनशे ठराव झाले हे खूपच गंभीर आहे. इतके ठराव तेही इतक्या काळात आणि बदलीला स्थगिती मिळाल्यानंतर हे संशयास्पद आहे. याची सखोल चौकशी करून यात, जे कोणी दोषी आढळतील त्यांच्यावर योग्य कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे प्रवीण जाधव यांनी केली आहे.

ठरावात कोणाचे हित हे तपासले पाहिजे – रघुनाथ पाटील

गेल्या काही महिन्यात मनपातील अधिकाऱ्यांनी जनतेच्या कामांकडे दुर्लक्ष केले, तरीदेखील तत्कालीन आयुक्तांनी अधिकाऱ्यांच्या पदरात पदोन्नत्या टाकल्या, आता जातेवेळी एवढे ठराव, ते ठराव तपासले पाहिजेत, त्यात कुणाचे हित दडलंय हे बघून संबंधित अधिकाऱ्यांवरही कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी आम आदमी पार्टीचे जिल्हा अध्यक्ष रघुनाथ पाटील यांनी केली आहे.

महापालिकेचेच हित साधले का – विजय औताडे
धोरणात्मक निर्णयासाठी ठराव घेतले जातात. महिनाभरात एवढे कोणते धोरणात्मक निर्णय घेतले आणि ते खरोखरच गरजेचे होते का याची चौकशी झाली पाहिजे. या ठरावांमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे का हे देखील बघावे लागेल, नवीन आयुक्तांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उप महापौर विजय औताडेयांनी केली आहे

हेही वाचलंत का? 

Back to top button