विमानतळ भागातील गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित | पुढारी

विमानतळ भागातील गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित

नायगाव; पुढारी वृत्तसेवा: प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी पुरंदर तालुक्यातील पारगाव परिसरात जागा सुचविल्यानंतर भांडवलदारांनी या भागात मोठी गुंतवणूक केली. सत्तांतर झाल्यानंतर या जागेचा प्रस्ताव बदलल्याने गुंतवणूकदारांची मोठी अडचण झाली होती. आता पुन्हा याच जागेचा पर्याय समोर आल्याचे बोलले जाते. यामुळे गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. सुरुवातीला पारगाव परिसरात विमानतळाची घोषणा झाल्यानंतर शहरी भागातील भांडवलदारांनी या भागात जमिनी खरेदीचा सपाटा लावला होता. दहा ते वीस वर्षांत पारगाव मेमाणे, एखतपूर- मुंजवडी, खानवडी, कुंभारवळन, वणपुरी परिसरात 3500 एकरच्या जवळपास खरेदी विक्रीचे व्यवहार झालेले आहेत. भांडवलदारांनी या जमिनी खरेदी केल्या आहेत.

सुरुवातीला या भागातील जागा विमानतळ प्रकल्पासाठी सुचविल्याने गुंतवणूकदारांचा आनंद ओसंडून वाहत होता. खरेदी केलेल्या जमिनींचे गुंतवणूकदारांनी गुंठेवारी पाडून लगत नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प असल्याचा संदर्भ देत विक्रीला सुरुवात केली होती. यामुळे हजारो एकर जमिनींचे व्यवहारदेखील झाले होते. परिणामी अनेक गुंतवणूकदारांना लाखो रुपयांचा आर्थिक फायदा झाला होता. या भागात आजही अनेक जागांना तार कुंपण असल्याचे दिसून येत आहे.

अशा परिस्थितीत येथील जागेचा प्रस्ताव रद्द करून पंधरा किलोमीटर अंतरावरील जागेचा पर्याय निवडला गेला. यामुळे कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करून जागा बदलल्याने गुंतवणूकदार रडकुंडीला आले होते. सध्या याच भागात पारगाव वगळून इतर गावात विमानतळ उभारणीचा मार्ग तयार झाल्याने गुंतवणूकदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

जागांचे भाव वाढले
नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ व शहरी भागातील भांडवलदारांनी केलेली गुंतवणूक यामुळे या भागातील जमिनींचे भाव गगनाला भिडले आहेत. स्थानिक शेतकरी आता चौकशी करून जमिनीच्या एकरी भावाचे अंदाज घेत आहेत.

Back to top button