Nashik : आवक मंदावल्याने नारळपाणी 80 रुपयांवर, केरळसह कर्नाटकमधील पाऊसपाण्याने वधारले भाव

नारळपाणी,www.pudhari.news
नारळपाणी,www.pudhari.news
Published on
Updated on

नाशिक, पंचवटी : गणेश बोडके
केरळसह कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे नाशिकसह राज्यभरात ओल्या नारळपाण्याचा (शहाळे) तुटवडा निर्माण झाला आहे. परिणामी, एरवी 30 ते 40 रुपयांना मिळणारे आरोग्यवर्धक नारळपाणी तब्बल 80 रुपयांवर पोहोचले आहे. आजवरचा हा सर्वांत उच्चांकी दर असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

नारळ उत्पादनांची मोठी बाजारपेठ असलेल्या केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये सध्या जोरदार पाऊस सुरू असल्याने वाहतूक व्यवस्था कोलमडली आहे. महाराष्ट्रातील बाजारात याच भागातून नारळ विक्रीसाठी येत असतात. परंतु माल आणण्यासाठी पावसामुळे वाहनेही मिळत नसल्याने मालाची आवक कमी झाली आहे. इतरवेळी महाराष्ट्रात दररोज शेकडो गाड्या माल येत असतो; मात्र सध्या ही आवक प्रचंड घटल्याने नारळपाण्याचा तुटवडा निर्माण झाला आहे. शिवाय नारळाची तोडणी करण्यासाठी पावसाळ्यामध्ये झाडावर चढण्यास मजूरवर्ग तयारी दर्शवित नाही. झाडांवरून सटकून पडण्याची भीती असल्याने पावसाळ्यात नारळाची तोडणी मंदावलेली असते. मालाची आवक कमी असल्याने भावही मोठ्या प्रमाणात वाढले असून, व्यापार्‍यांना वाहतूक खर्चासह जागेवर माल 30 ते 40 रुपये नगाप्रमाणे मिळत असल्याने ते विक्रेत्यांना चढ्या भावाने अर्थात, 45 ते 50 रुपयांना विक्री करत आहेत.त्यामुळे किरकोळ बाजारात ग्राहकांना 60, 70 आणि 80 रुपयांना एक नारळ खरेदी करावे लागत आहे.

दरम्यान, निरोगी आरोग्यासाठी डॉक्टरांकडून नारळपाणी पिण्याचा सल्ला दिला जातो. त्यामुळे आरोग्यवर्धक नारळपाण्याला मोठी मागणी आहे. रुग्णांसाठी नारळपाणी एका सलाइनचे काम करते, असेही बोलले जाते. त्यामुळे नारळपाण्याचे दर वाढल्याने नागरिकांना आर्थिक फटका सहन करावा लागत आहे.

पंधरा दिवसांपासून मालाचा तुटवडा आहे. विक्रीसाठी मालच मिळत नाही. नुकतीच एक गाडी आली होती. परंतु जास्त पैसे देऊन माल खरेदी करावा लागला. नारळाबरोबरच अन्य फळांचीही चांगली विक्री होते. त्यामुळे कमी नफा असूनही नारळपाणी विक्रीसाठी ठेवावे लागते.
– गोरख भाबड, फळविक्रेता, मखमलाबाद रोड, पंचवटी

हेही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news