उमरखेड (यवतमाळ); पुढारी वृतसेवा : उमरखेड येथील भाऊसाहेब माने कृषी विद्यालयातील प्राध्यापक सचिन देशमुख यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत दिग्रस तालुक्यातील सिंगद येथील पुलाखाली आढळला होता. सदर प्राध्यापकाचा खून अनैतिक संबंधातून झाल्याचे समजल्याने गुरुवारी याप्रकरणीतील वनपाल असलेली पत्नी धनश्री देशमुख (वय २८) आणि वनपाल शिवम बचके (वय ३३, रा. आकोट) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तविली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, प्रा. सचिन वसंतराव देशमुख यांचा मंगळवारी सकाळी पुसद-दिग्रस मार्गावर पुलाखाली संशयास्पद स्थितीत मृतदेह आढळला होता. पोलिसांच्या चौकशीनंतर मृतदेहाची ओळख पटली. प्रा. देशमुख हे गेल्या शुक्रवारी अकोला जिल्ह्यातील आकोट येथे वनपाल म्हणून नोकरीस असलेल्या पत्नीला भेटण्यासाठी गेले होते. मात्र, त्यांचा दिग्रस तालुक्यातील सिंगद येथे मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
यादरम्यान बुधवारी शवचिकित्सा अहवालातून देशमुख यांचा गळा आवळून खून केल्याचे निष्पण झाले. यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासावर लक्ष केंद्रीत करत आणि खबऱ्यांच्या माध्यमातून या खूनाची माहिती गोळा केली. अखेर अनैतिक संबंधातून सचिनचा खून झाल्याचे पुढे आले. यानंतर वनपाल शिवम चंदन बचके आणि प्रा. सचिन देशमुख यांची पत्नी वनपाल धनश्री देशमुख यांना ताब्यात घेण्यात आले आहे.
उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिग्रस पोलीस, उमरखेड पोलीस, एलसीबीसह सायबर आणि स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने आकोट येथे तपासाला गती दिली. या प्रकरणाचा अधिक तपास अपर पोलीस अधीक्षक डॉ. खंडेराव धरणे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी आदित्य मिरखेलकर हे करीत आहे.
हेही वाचलंत का?