दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा | पुढारी

दंडेलशाही करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात, शरद पवारांचा केंद्रावर निशाणा

धुळे : पुढारी वृत्तसेवा

आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसल्याचे सांगणाऱ्या इंग्रजी राजवटीला महात्मा गांधींच्या त्यागातून उभ्या राहिलेल्या लोकांच्या संघटित शक्तीपुढे पराभव पत्करावा लागला. हा या देशाचा इतिहास आहे. या देशात सत्तेचा गैरवापर करून दंडली करणाऱ्यांना धडा शिकवण्याची ताकद सामान्य माणसात असल्याचा इशारा राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी आज धुळ्यातून दिला आहे.

धुळे येथील राष्ट्रवादी भवनाच्या अनावरणाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमात प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी आमदार अनिल गोटे यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार एकनाथराव खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी मंत्री डॉक्टर हेमंत देशमुख, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष रणजीत भोसले, ग्रामीण जिल्हाध्यक्ष प्रशांत भदाणे, संदीप बेडसे, नंदुरबारचे जिल्हाध्यक्ष मोरे, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, विधान सभेचे माजी सभापती अरुणभाई गुजराती, पक्षाचे निरीक्षक अर्जुन टिळे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केंद्र सरकारवर वेगवेगळ्या माध्यमातून टीका केली. सध्या राज्यात विदर्भातील जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे नेते अजित पवार त्या भागात गेल्या दोन दिवसापासून जनतेला व शेतकऱ्यांना धीर देण्याचे काम करीत आहेत. नुकसान झालेल्या शेतांच्या बांधांवर जाऊन प्रशासनाला सूचना देत आहेत. हाच राष्ट्रवादीचा दृष्टिकोन असला पाहिजे. जनता संकटात असेल त्यावेळी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता मदत करण्यासाठी मागे राहत नाही. सध्या देशात वेगळे चित्र आहे. सत्ता एकाच हातात केंद्रित करण्याची भूमिका घेतली जाते आहे. महाराष्ट्रात 1960 मध्ये स्व. यशवंतराव चव्हाण यांनी सत्तेचे विकेंद्रीकरण करून पंचायत राजची स्थापना केली. जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या सुरू करून निर्णय घेण्याचे अधिकार गाव पातळीवरील माणसाच्या हातात दिले. अनेक लोकांच्या हातात सत्ता गेली पाहिजे. हा या मागचा दृष्टिकोन होता. पण सध्या सत्ता आपल्या मुठीत ठेवून आपण देशाचे मालक असल्याचे चित्र दिसून येते आहे. देशात वेगवेगळी मते असू शकतात. पण प्रत्येकाचे मत ऐकून घेण्याची भूमिका घ्यावी लागते. त्यासाठी सौजन्य असावे लागते. देशात आज ते चित्र दिसत नाही. बहुमताचा दुरुपयोग होतो आहे. पाशवी बहुमत आहे असे जनतेला दिसता कामा नये, असे ते म्हणाले.

तर नाचक्की झाली असती…

संसदेत काँग्रेसच्या एका खासदाराने राष्ट्रपती संदर्भात एक चुकीचा शब्द वापरला. ही चूकच होती. त्या संदर्भात त्यांनी माफी मागितली. सभागृहामध्ये माफी मागण्याची त्यांनी तयारी देखील दाखवली. पण विधान केले दुसऱ्याने आणि माफी तिसऱ्याकडून मागण्याची मागणी संसदेत केली गेली. या गोंधळाची स्थिती थांबल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी एका ज्येष्ठ सदस्याला आपल्यावर टीका करण्याचे कारण काय असे विचारले. त्यावेळी त्यांच्या अंगावर अनेक जण धावून आले. यावेळी एक वेगळा प्रकार होण्याची शक्यता होती. मात्र राष्ट्रवादीच्या एका खासदाराने त्यांना तेथून बाहेर काढून गाडीत बसवले आणि घरी रवाना केले. संसदेत असा चुकीचा प्रकार घडला असता तर देशात नाचक्की झाली असती .असे देखील त्यांनी सांगितले .

महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना विधानसभेच्या अध्यक्ष निवडीसंदर्भातील पत्र राज्यपाल यांना पाठवले गेले. या पत्रावर त्यांनी दोन वर्ष स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे सभापतीची जागा रिक्त राहिली. मात्र सरकार बदलताच दोन दिवसात राज्यपालांनी निवडणूक घेण्याचे आदेश काढले, एकाच सभागृहात राज्यपालाने घेतलेल्या या दोन भूमिकेमुळे लोकशाही पद्धतीवर लोकांनी विश्वास ठेवायचा कसा, हा मुद्दा असल्याचा टोला देखील त्यांनी लावला आहे.

जगातील आपल्या साम्राज्यावर सूर्य मावळत नसल्याचे सांगणाऱ्यांच्या विरोधात त्यागाच्या माध्यमातून महात्मा गांधी यांनी सत्याग्रह केला. या नेतृत्वाच्या आधारावर संघटित शक्ती उभी राहिल्यामुळे इंग्रजांचे साम्राज्य गेले. त्यांना या देशातून जावे लागले. इंग्रजांचा पराभव या देशाचा सामान्य माणूस करू शकतो. हा इतिहास आहे. त्यामुळे या देशात सत्तेचा गैरवापर करून दंडेलशाही करणाऱ्यांना देखील सामान्य माणूस त्यांची जागा दाखवू शकतो असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

Back to top button