बेळगाव : मठांवरील हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश; चार संशयित दहशतवाद्यांना अटक | पुढारी

बेळगाव : मठांवरील हल्ल्याच्या कटाचा पर्दाफाश; चार संशयित दहशतवाद्यांना अटक

बंगळूर; पुढारी वृत्तसेवा : स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवावेळी 15 ऑगस्ट रोजी दक्षिण भारतातील तीन प्रमुख मठांवर दहशतवादी हल्ल्याचा कट आखण्यात आला होता. पण तामिळनाडू आणि कर्नाटक पोलिसांनी हा कट उधळून लावला. या प्रकरणी इस्लामिक स्टेट आणि अल कायदा संघटनेच्या चार संशयित दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे.

गुप्तचर खात्याने दिलेल्या माहितीनुसार तामिळनाडू पोलिसांनी 25 जुलै रोजी इस्लामिक स्टेट संघटनेच्या संपर्कात असणारे आसिफ मुस्तीन आणि यासीर नवाज यांना अटक केली होती. त्यांची कसून चौकशी करण्यात आली. आसिफने 30 लोकांची टोळी रचली होती. एक महिना आधीच त्या सर्वांनी तीन प्रमुख मठांच्या परिसरात जाऊन ठिकाणाची संपूर्ण माहिती घेतली. कोणत्या ठिकाणी स्फोटके ठेवायची, याचा आराखडा त्यांनी आखला. स्फोटके गोळा करण्याचे काम ते करत होते.26 जुलै रोजी बंगळूर शहर पोलिसांनी अख्तर हुसेन लष्कर आणि मोहम्मद जुबा यांना अटक केली. त्यांची चौकशी केल्यानंतर अनेक ठिकाणी आत्मघाती हल्ल्यांचा कट रचण्यात आल्याची माहिती उघडकीस आली.

गुन्हा कबूल केल्याची माहिती जिहादी दहशतवादी संघटना अल कायदामध्ये प्रवेश मिळवण्याच्या प्रयत्नात ते होते. सौदी अरेबिया आणि अफगाणिस्तानमध्ये जाळे निर्माण करण्याची योजना त्यांनी आखली होती. विविध सोशल मीडिया वेबसाईटस्वर व्हिडीओ आणि इतर माहिती अपलोड करून ते युवकांना आपल्या टोळीत सहभागी होण्याचे आवाहन करत होते. त्यांना पकडण्यात आल्यानंतर त्यांच्याकडून अनेक धार्मिक कागदपत्रे, जिहादी साहित्य सापडले. ‘सर तन से जुदा’ मोहिमेसंबंधी त्यांच्याकडून काही साहित्य जप्त करण्यात आले. चौघाही संशयित दहशतवाद्यांनी आपला गुन्हा कबूल केल्याची माहिती मिळाली आहे.

Back to top button