त्र्यंबकेश्वर : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
ब्रह्मगिरी पर्वताला आहिल्या धरणाच्या वरच्या बाजूस असलेल्या जांबाची वाडी परिसरात जमिनीला तडा गेल्याने परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे. याच परिसरात काही वर्षांपूर्वी एका बांधकाम व्यावसायिकाने जेसीबीने उत्खनन केल्याने पर्यावरणप्रेमींनी हे काम थांबवले होते.
ब—ह्मगिरीच्या परिसरात खासगी मालकीच्या जमिनी असून, काही भागात नागली वरईची शेती केली जाते. मात्र, मुसळधारमुळे येथील जमिनीला तडा गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर तहसीलदार दीपक गिरासे आणि महसूल अधिकारी तसेच ग्रामसेवक गणेश पगार यांसह स्थानिक ग्रामस्थांनी भेट देत वस्तुस्थिती जाणून घेतली. जांबाच्या वाडीपासून साधारणत: 350 मीटर अंतरावर असलेल्या परिसराचा मानवी वस्तीस धोका नाही. तसेच भूस्खलन होणार नसल्याचा निर्वाळा महसूल अधिका-यांनी दिला आहे. दरम्यान, मागच्या काही वर्षांमध्ये मेटघरकिल्ला ग्रामपंचायतीत येणा-या विनायखिंड परिसरात दरड कोसळून एकाचा मृत्यू झाला होता. तेव्हापासून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. जांबाची वाडी येथील ग्रामस्थांनी स्थलांतर करण्यात यावे आणि ञ्यंबक नगरपालिका हद्दीत पुनर्वसन करण्याची मागणी तहसीलदार दीपक गिरासे यांच्याकडे करण्यात आली आहे.
तडा गेलेला भूभाग हा जांबाची वाडी वस्तीपासून 350 मी. अंतरावर आहे. मानवी वस्तीला परिसराचा मुळीच धोका संभवत नाही.
– गणेश पगार, ग्रामसेवक, मेटघर किल्ला ग्रामपंचायत