नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक | पुढारी

नाशिक : मंदिरातील घंटा चोरीप्रकरणी दोघा संशयितांना अटक

नाशिक (चांदवड) : पुढारी वृत्तसेवा 

तालुक्यातील कोलटेक फाटा शिवारातील म्हसोबा मंदिरातून २० हजार रुपये किंमतीच्या मोठ्या आकाराच्या सहा पितळी घंटा चोरणाऱ्या दोघा संशयिताना निफाड तालुक्यातील गोंदेगाव व गोळेगाव येथून पकडण्यात चांदवड पोलिसांना यश आले आहे. अवघ्या २४ तासाच्या आत चांदवड पोलिसांनी संशयिताना बेड्या ठोकल्या आहेत.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तालुक्यातील चांदवड – लासलगाव रोडवरील कोलटेक शिवारात म्हसोबा महाराजांचे मंदिर आहे. या मंदिरातील मोठ्या आकाराच्या पितळाच्या ६ घंटा गुरुवार (दि. २१) रोजी बजाज कंपनीच्या काळ्या रंगाच्या मोटरसायकलवर (क्र. एम. एच.१५, एफ. डब्ल्यू. ७९८८) आलेल्या दोघा अज्ञात चोरट्यांनी चोरून पळ काढला होता. याबाबत नामदेव राजाराम खांगळ (३०) यांनी चांदवड पोलिसांत फिर्याद दिल्याने चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

या गुन्हातील संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी चांदवडचे पोलीस निरीक्षक समीर बारवकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक भावलाल हेंबाडे, पोलीस हवालदार मन्साराम बागुल, प्रवीण थोरात, दिनेश सूळ यांची नेमणूक करण्यात आली होती. या पथकाने चोरीतील मोटरसायकलच्या नंबरवरून निफाड तालुक्यातील परवेज रफिक मुलानी (३२, गोंदेगाव) व योगेश उर्फ मनोज तुकाराम बर्डे (२२, गोळेगाव) यांना ताब्यात घेतले होते. या संशयितांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी कोलटेक शिवारातील म्हसोबा मंदिर व आणखी एका ठिकाणच्या मंदिरातून घंटा चोरल्याची कबुली दिली आहे. या दोघा संशयिताना चांदवड पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु आहे.

हेही वाचा :

Back to top button